Tue, Jul 23, 2019 17:22होमपेज › Pune › हातगाडी चालकांना हप्ता सक्ती 

हातगाडी चालकांना हप्ता सक्ती 

Published On: Jan 09 2018 1:35AM | Last Updated: Jan 09 2018 12:26AM

बुकमार्क करा
खडकी : वार्ताहर 

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत बस स्थानका शेजारी बसणार्‍या अनधिकृत पथारीधारक तसेच हातगाड्या व्यवसाईकांकडून काही व्यक्ती जबरदस्तीने 300 रुपये हप्ता वसुल करीत असल्याचे समजते. पैसे न दिल्यास शिवीगाळ तसेच काही प्रसंगी मारहाण केली जाते. परंतु, याबाबत  पोलिस आणि बोर्ड प्रशासन मात्र मुग गिळून गप्पा बसण्याची उत्तम भूमीका वटवीत आहे. बोर्डाच्या हद्दीत बस स्थानकाशेजारी मोठ्या प्रमाणात पथारीधारक तसेच हातगाड्या व्यवसाय करीत आहेत. सर्व पथारीधारक तसेच हातगाडी चालक अनधिकृतपणे व्यवसाय करीत असून बोर्ड प्रशासनाच्या वतीने अधिक अनधिकृत अतिक्रमण काढण्यात आले होते. मात्र अनेक व्यवसाईकांकडे परवाने नसून ते बोर्डाची 10 रुपये पावती फाडतात.

मात्र या परिसरात व्यवसाय करणार्‍या सर्व व्यवसाईकांकडून काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती जबरदस्ती हप्ता वसूल करीत असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीने व्यवसायीकाने सांगितले.  बोर्डाच्या जागेत व्यवसाय करणार्‍यांना कडून बोर्डे प्रशासन दररोज 10  रुपये व्यवसाय करण्याबद्दल शुल्क आकारते. मात्र बोर्डाची पावती घेतल्यावर देखील काही व्यक्ती त्यांच्याकडून दररोज 300 रुपयांची हप्ता वसुली करीत असल्याचे येथे बसत असलेल्या अनेक व्यवसायिकांनी सांगितले आहे. हप्ता वसूल करणार्‍यांची 7 ते 9 तरुणांची टोळी असून सायंकाळी 7 वाजेनंतर हप्ता वसुली करीत असल्याचे समजते. पथारीधारक तसेच हातगाडी धारकांचा व्यवसाय हा बेभरवशाचा असतो. एखाद्या दिवशी कमी तर एखाद्या दिवशी जास्त व्यवसाय होत असल्याने 300 रूपयांची हप्ता वसूही अनेक व्यवसायिकांना न परवडणारी आहे. परंतु, व्यवसाय करण्यासाठी अशा बाबींना बळी पडावे लागत असल्याचेही येथील व्यवसायिकांनी सांगितले.  हप्ता वसुली होत असतानाही प्रशासन याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे.