होमपेज › Pune › हडपसरमध्ये सराईताचा भरदिवसा खून

हडपसरमध्ये सराईताचा भरदिवसा खून

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 29 2018 1:00AMपुणे / हडपसर : प्रतिनिधी

भरदिवसा रस्त्यात अडवून टोळक्याने सराईत गुन्हेगारावर कोयत्याने वार करून त्याचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील गोंधळेनगर भागात घडली. भरदिवसा आणि रहदारी असलेल्या रस्त्यावरच अचानक झालेल्या या घटनेने परिसरात चांगलाच गोंधळ उडाला. पूर्ववैमन्यासातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सुजीत मिस्त्रीलाल वर्मा (वय 26, रा. मगरपट्टा, मूळ अहमदनगर) असे खून झालेल्या या गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजित हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. अहमदनगरमध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला तडीपार करण्यात आले होते. तेव्हापासून तो गेल्या काही वर्षांपासून मांजरी परिसरात राहत होता. पुण्यात आल्यानंतर त्याने दादागिरी सुरू केली. मांजरी, गोंधळेनगर, तसेच सातववाडी भागातील तरुणांना हेरून, त्यांना गुन्हेगारी क्षेत्रात ओढून छोटे- मोठे गुन्हे करीत होता. त्यामुळे त्याचे अनेकांसोबत वैर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात मारहाणीचे चार गुन्हे देखील दाखल आहेत. शनिवारीच (ता. 27) येथील काही तरुणांसोबत त्याचा वाद झाला होता. याप्रकरणी त्याच्यावर  हडपसर पोलिस ठाण्यात हाणामारीचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, सुजित हा रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्याच्या बुलेटवरून गोंधळेनगर येथून सासवड रोडच्या दिशेने निघाला होता. तो शनि मंदिराजवळील रस्त्यावर आला असता, अचानक एका टोळक्याने त्याची दुचाकी अडविली. तसेच, त्याला शिवीगाळ करत त्याच्यावर कोयत्याने सपा-सप वार केले. त्यानंतर हे टोळके तेथून पसार झाले. दहा ते पंधरा मिनिट हा सर्व प्रकार सुरु होता. यात सुजित हा गंभीर जखमी झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडला. नागरिकांनी या घटनेची माहिती तत्काळ हडपसर पोलिसांना दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व वैमनस्यातून सुजित याचा खून करण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यातील आरोपींची नावे निष्पन्न झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींच्या मागावर पथके रवाना करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून  सांगण्यात आले.