Fri, Apr 26, 2019 18:18होमपेज › Pune › पदवीधर गटावर एकता पॅनेलचेच वर्चस्व

पदवीधर गटावर एकता पॅनेलचेच वर्चस्व

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यवस्थापन गटासाठी काटे कि टक्कर पहायला मिळाल्यानंतर पदवीधर गटासाठी देखील चुरशीची लढत अपेक्षित होती. परंतु पदवीधर गटाच्या निवडणुकीत मात्र एकता पॅनेलने आपले एकहाती वर्चस्व सिध्द करत दहापैकी आठ जागा जिंकून घवघवीत यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. तर प्रगती पॅनेलला मात्र केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याचे मंगळवारी पदवीधर गटाच्या जाहीर झालेल्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या दहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी संध्याकाळी सुरू झालेली मतमोजणीची प्रक्रिया मंगळवारी पहाटे संपली. यामध्ये एकता पॅनेलला खुल्या तीन तर राखीव पाचही जागांवर विजय मिळवता आला आहे. यामध्ये खुल्या गटातून संतोष ढोरे, तानाजी वाघ, तसेच प्रसेनजीत फडणवीस तर दादासाहेब शिनलकर - ओबीसी, बागेश्री मंठाळकर - महिला राखीव, विश्‍वनाथ पाडवी - एसटी राखीव, शशिकांत तिकोटे - एससी राखीव, विजय सोनावणे - एनटी राखीव यांनी राखीव गटातून विजय मिळवला आहे. तर प्रगती पॅनेलला खुल्या गटातून दोन जागांवर अनिल विखे तसेच अभिषेक बोके यांना विजय मिळवता आला आहे. 

पदवीधर गटातील ज्या व्यक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले होते ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू प्रसेनजीत फडणवीस. प्रसेनजित सहज निवडून येतील, असे गृहीत धरून निवडणुकीचे नियोजन केले जात होते. पुण्यातील रा. स्व. संघाशी जवळीक असणार्‍या संस्थांच्या महाविद्यालयांवर प्रसेनजित यांची भिस्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या फेरीतच ते विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करुन निवडून येतील, असे मानले गेले. मतमोजणीच्या वेळी देखील एकता पॅनेलचे संतोष ढोरे आणि फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र होते. सायंकाळनंतर मात्र चित्र बदलले. ढोरे हे पुढे जात राहिले आणि प्रसेनजित यांच्या नावावर पडणारा मतांचा ओघ थांबला. त्यामुळे पहिल्या फेरीच्या निकालात ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.

भाजपने प्रसेनजित यांच्यासाठी ज्या संस्थांना गळ घातली, त्यांच्याकडून दगाफटका झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. खरे तर प्रसेनजित यांची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. परंतु त्यांच्या विजयासाठी आवश्यक असणारे कष्ट घेतले गेले नाहीत. सुरवातीच्या काळात नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना मतदान वाढविण्यासाठी सांगण्यात आले होते. परंतु त्याचाही फारसा फायदा झालेला दिसला नाही. पॅनेलमधील पराभूत झालेल्या उमेदवारांची फारशी मतेही मतमोजणीच्या शेवटच्या फेर्‍यांमध्ये त्यांना मिळाली नाहीत. नगर आणि नाशिक जिल्ह्यातूनही त्यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा देखील ते पूर्ण करु शकले नाहीत. त्यांच्या पुढे अन्य एखादा उमेदवार असता तर त्यांना पराभव देखील स्वीकारावा लागला असता. ते शेवटच्या टप्प्यात झगडत विजयी झाले.ते देखील पाचव्या क्रमांकावर राहून. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या भावावर ही वेळ का आली यावरून मात्र विद्यापीठात जोरदार चर्चा रंगलेली दिसून आली.