Wed, Jun 26, 2019 17:29होमपेज › Pune › नियमबाह्य दिलेल्या मान्यता नियमित करण्याचा डाव

नियमबाह्य दिलेल्या मान्यता नियमित करण्याचा डाव

Published On: Feb 07 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 1:10AMपुणे : गणेश खळदकर 

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शासनाचे अनुदान घेऊन चालविल्या जाणार्‍या अनुदानित शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने 4 हजार 11 शिक्षकांची नियुक्‍ती केलेल्या प्रकरणाची पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांच्या मान्यता रद्द केल्या जातील; तसेच दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात दिले आहे. परंतु, याच नियमबाह्य मान्यता शिक्षक संघटनांच्या माध्यमातून नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून, येत्या काही दिवसांमध्ये त्या नियमित करण्याचा डाव असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी  दिली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध शाळांमधील तब्बल 4  हजार 11 मान्यता या नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्या आहेत. यामध्ये प्राथमिकच्या 488, माध्यमिकच्या 2 हजार 805 आणि उच्च माध्यमिकच्या 718 अशा एकूण 4 हजार 11 मान्यता आहेत. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 नुसार नोकरीत असलेला शिक्षक हा शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टिईटी उत्तीर्ण असणे गरजेचे असताना देखील यातील बहुसंख्य शिक्षक हे टीईटी उत्तीर्ण नसल्याचे वास्तव आहे. नियमबाह्य मान्यतांची व्हिआरएस म्हणजे रिक्त जागा ,बिंदूनामावली आणि निवड प्रक्रिया यानुसार चौकशी गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे.

परंतु, आयुक्त कार्यालयात मात्र अद्याप एकही मान्यता चुकीची असल्याचा अहवाल सादर केला नाही. नियमबाह्य मान्यता सिद्ध झाल्यानंतर दोषी अधिकारी आणि अन्य संबंधित सगळ्यांच्याच अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे एकीकडे अधिकार्‍यांना वाचवायचे आणि दुसरीकडे शिक्षकांना अभय द्यायचे यासाठी काही शिक्षक संघटना सक्रिय झाल्या असून त्यांनी मंत्रालयातूनच मान्यता नियमित करण्याबाबतचे आश्‍वासन मिळवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीयदृष्ट्या येत्या काळातील निवडणुकांमुळे शिक्षकांचा रोष पत्करणे कोणालाही परवडणारे नाही.

मान्यता देत असताना संस्थांचालक, शिक्षक आणि अधिकारी यांच्यात झालेले अर्थिक व्यवहार आणि संघटनांचा दबाव यामुळे मान्यता नियमित करण्याकडे वाटचाल सुरू आहे. परंतु हे शिक्षक केंद्राच्या नियमाप्रमाणे टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत. त्यासाठीच त्यांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठीची संधी मिळावी यासाठी सुधारित परीपत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे आता राज्यात जवळपास 4 हजार 11 मान्यता या नियमबाह्य असल्याचे उघड झाल्यानंतरही आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आश्‍वासनानंतरही या मान्यता नियमित होणार असल्याची चर्चा शिक्षण विभागात रंगली आहे.