Fri, Apr 26, 2019 16:01होमपेज › Pune › सोने कारागिराला भरदुपारी लुटले

सोने कारागिराला भरदुपारी लुटले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

भर दुपारी लुटारूंनी सोने कारागिराला दुकानात शिरून कोयत्याचा धाक दाखवला आणि सोने देण्याची मागणी केली. कारागिराने हिंमत दाखवून प्रतिकार करताच त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून 15 हजार रुपयांचा मोबाईल पळविल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान फरासखाना पोलिसांनी 6 तासात आरोपींना अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे. रोहित गौतम जगताप (वय 24, रा. रामटेकडी, हडपसर), गणेश शंकर नाईक (वय 24, रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रोशन संजय सोनी (वय 27, आंबेगाव पठार) यांनी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी सोनी हे सोन्याचे कारागीर आहेत. त्यांनी कसबा पेठेतील गायकवाड यांच्या वाड्यात भाडेतत्वावर खोली घेतली आहे. सराफ व्यावसायिकांकडून सोने दिल्यानंतर ते त्याचे दागिने बनवून देतात. ते मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दुकानात बसले होते. त्यावेळी आरोपी तोंडाला रूमाल लावून दुकानात घुसले. त्यांनी सोनी यांना कोयत्याचा धाक दाखवला. तसेच, सोने देण्याची मागणी केली. मात्र, त्यांनी नकार देत प्रतिकार केला. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारला. त्यामुळे त्यांना काहीच समजले नाही. आरोपींनी दुकानात सोन्याची शोधा-शोध केली. परंतु, त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यामुळे फिर्यादींकडील मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले. 

फिर्यादींनी फरासखाना पोलिसांकडे धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक बाळासाहेब अंबुरे, सहायक निरीक्षक महेंद्र जाधव, कर्मचारी संदीप पाटील व त्यांच्या पथकाने आरोपींचा माग काढला. त्यावेऴी खबर्‍यामार्फत अल्पवयीन मुलाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार तिघांना सहा तासाच्या आत पकडले. आरोपी गणेश नाईक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर रॉबरी व बॉडी ऑफेन्सचे गुन्हे दाखल आहेत. तो यापूर्वी सोमवार पेठेत राहण्यास होता. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाची ओळख होती. दरम्यान त्यांना पैशांची अडचण होती. त्यामुळे त्यांनी मोठा हात मारून पैसे कमविण्याचे ठरवल्याचे तपासात समोर आले आहे.