Fri, Jul 19, 2019 00:56होमपेज › Pune › टोळ्या जेरबंद

टोळ्या जेरबंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

शहरात दिवसाढवळ्या सोन साखळी हिसकावणार्‍या, घरे फोडणार्‍या आणि सोसायट्यात घुसून मिरची पावडर डोळ्यात फेकून लुबाडणार्‍या टोळ्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोनसाखळी आणि घरफोड्यांचे प्रत्येकी चार गुन्हे उघडकीस आणत दहा लाखांचा माल जप्त केला असून याप्रकरणी दोन बांगलादेशींना अटक केली आहे. ते अवैधरित्या शहरात वास्तव्य करून चोर्‍या करत असल्याचे तपासात समोर आले आहे. तर दुसरीकडे शहरात एकट्या नागरिकांना गाठून, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवून मिरची पावडर डोळ्यात टाकून लुटणार्‍या सहा जणांच्या टोळीलाही गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद करून धडाकेबाज कामगिरी केली आहे.

या पकडलेल्या सराईतांकडून शहरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.शहरात वाढत्या  घरफोड्यां, सोनसाखळी चोरीच्या घटनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची दखल घेऊन वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते.    सिंहगड रोड परिसरात दिवसा घर फोडून 39 तोळे सोने लंपास केले होते. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. त्यात आरोपी कैद झाले होते. त्यांचा माग काढत असताना 

इदानूर रहेमान राकिब (वय 62, रा. संतोषनगर, कात्रज, मूळ बांगलादेश) व जाकिर कोबिद हुसेन (वय 42) हे सराईत नवले ब्रिजवरून कात्रजकडे गेल्याचे समोर आले. त्यानुसार या परिसरात माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी कर्मचारी अनिरुद्ध सावर्डे यांना एकजण आढळून आला. त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.   त्यांच्याकडून घरफोडीचे चार गुन्हे उघडकीस आणत 9 लाखांचे सोन्याचे दागिने, अर्धा किलो चांदी असा एकूण दहा लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. 

दोघांना 2015 मध्ये 7 गुन्ह्यांमध्ये अटक केली होती. त्यानंतर जून 2017 मध्ये ते जामिनावर सुटले. त्यानंतर त्यांना घरफोडी करताना रंगेहाथ पकडले होते. त्याही गुन्ह्यातून जामिनावर आल्यानंतर त्यांनी कात्रज परिसरात राहून घरफोड्या केल्या आहेत. इदानूर राकिब हा अवैधरित्या भारताता आला आहे, तर जाकिर हा एका महिन्याच्या प्रवासी व्हिसावर आला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट पाचने सोनसाखळी चोरणार्‍या कंबर ऊर्फ डंपर शहाजान जाफरी/इराणी (वय 32, रा. लोणी काळभोर) याला अटक केली आहे. त्याच्याकडून शहरातील सोनसाखळीचे चार गुन्हे उघडकीस आणत 1 लाख 84 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. त्याचा साथीदार पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई  सहायक आयुक्त समीर शेख, युनिट एकचे सतीश निकम व कर्मचारी अतुल गायकवाड, दिनेश गडांकुश, खराडे, भिलारे, वग्गू, फरांदे यांच्या पथकाने केली आहे.