Thu, Apr 25, 2019 23:25होमपेज › Pune › लिफ्टच्या बहाण्याने लुटणारी टोळी सक्रिय

लिफ्टच्या बहाण्याने लुटणारी टोळी सक्रिय

Published On: Dec 14 2017 2:16AM | Last Updated: Dec 14 2017 1:32AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

शहरात प्रवाशांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने स्कोडा कारमध्ये बसवून डोळ्यात मिरची पुड टाकून शस्त्राच्या धाकाने लुटमारी केल्याचे दोन प्रकार समोर आले आहेत. यात एका घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी चक्क भावाच्या साखरपुड्यासाठी जाणार्‍या पोलिस कॉन्स्टेबललाच लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसर्‍या घटनेत कोल्हापूरला जाणार्‍या प्रवशाला कात्रज घाटात  साडेसोळा हजारांना लुटले. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दोन घटनांमध्ये एक लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.  

याप्रकरणी तुषार काळे (वय 26, रा. नालासोपारा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अशोक पाटील (29, चिखली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  मोहसिन आयुब पठाण (वय 27, रा. कौसरबाग मशिदीजवळ, कोंढवा), अरबाज युनूस पठाण (वय 26, रा. सय्यद नगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार काळे हे पालघर जिल्ह्यात पोलिस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या भावाचा साखरपुड्याचा कार्यक्रम अहमदनगर जिल्ह्यातील त्यांच्या गावी होता. त्यामुळे ते सुट्टी घेऊन 1 डिसेंबर रोजी अहमदनगर येथे जाण्यासाठी निघाले होते.

त्या वेळी ते पुण्यात येरवडा परिसरात  रात्री अकराच्या सुमारास गुंजन चौक येथे अहमदनगरला जाण्यासाठी बसची वाट पाहात उभे होते. त्या वेळी एक स्कोडा कार तेथे आली. कारमध्ये तीन अनोळखी लोक बसलेले होते. त्यांनी काळे यांना नगरला सोडतो असे सांगून लिफ्ट दिली. त्यानंतर  ते लोणीकंद खडी क्रशरजवळ आल्यावर त्यांच्या गळ्याला चाकू लावून डोळ्यात मिरची पुड टाकून मोबाईल, घड्याळ, कपडे, रोख रक्कम असा 73 हजार 699 रुपये किंमतीचा ऐवज काढून घेऊन गाडीतून ढकलून दिले. त्यानंतर त्यांनी सुट्टी संपल्यावर याप्रकरणी येरवडा पोलिस 

ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस. व्ही. बोबडे करत आहेत. तर दुसर्‍या घटनेतील फिर्यादी यांचा कोल्हापूर येथे व्यवसाय आहे. ते पुण्यातून 29 नोव्हेंबर रोजी रात्री एकच्या सुमारास कात्रजच्या शेवटच्या बसथांब्याजवळ उभे होते. त्यांना कोल्हापूरला जायचे असल्याने त्यांनी स्कोडा कारचालकाला लिफ्ट मागितली. काही अंतरावर गेल्यानंतर कात्रज घाटामध्ये अंधारात गाडी बाजूला घेऊन पाटील यांना कुकरीसारख्या शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील 14 हजार 900 रुपये रोख आणि मोबाईल असा एकूण 16 हजार 300 रुपयांचा ऐवज लुटला. त्यांना घाटात सोडून  मोहसीन पठाण व अरबाज पठाण हे दोघेही पळून गेले. याबाबत भारती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शिवदास गायकवाड करत आहेत.