Fri, Jul 19, 2019 20:38होमपेज › Pune › मॅडम आता आमचं काही पटेना

पुण्यातील पहिलेच प्रकरण; मॅडम, आता आमचं काही पटेना!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे :अक्षय फाटक

ते दोघेही सामान्य घरातले... त्यांची नऊ वर्षांपासूनची निखळ मैत्री...दोघेही उच्चशिक्षित...शिक्षणही सोबत झाले...पण नऊ वर्षांची निखळ मैत्री असतानाही दोघांचे पटेना... सतत खटके उडायला लागले. मग त्यांनी सरळ पुणे पोलिसांच्या महिला सहायक कक्षात धाव घेतली आणि ‘मॅडम, आता आमचं काही पटेना’ अशी तक्रार केली. पोलिसांना वाटले ते प्रेमी युगुल असेल किंवा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असतील. पण त्यांची फक्त निखळ मैत्री होती. त्यांची ही कहाणी ऐकून पोलिसही चक्रावून गेले.  सुरुवातीला काय सल्ला द्यावा, याबाबत महिला सहायक कक्षातील अधिकार्‍यांनाही काही सुचेना. काही वेळानंतर मात्र पोलिसांनी ही निखळ मैत्री अशीच कायम ठेवण्याचा सल्ला देऊन त्या दोघांना पाठवून दिले.

रमेश (काल्पनिक नाव) फुरसुंगी परिसरातला आहे, तर कविता (काल्पनिक नाव) शिक्षणानिमित्त पुण्यात आली आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ते एकत्र शिक्षण घेतात. त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर निखळ मैत्रीत झाले. मैत्री म्हटल्यानंतर एकमेकांच्या गोष्टी शेअर करणे, एकमेकांच्या अडचणी सोडवणे हे आलेच. तसे त्यांच्यातही होते. दोघांनी त्यांच्यातल्या काही आवडीनिवडीही एकसारख्या ठरवून घेतल्या होत्या. इतकेच काय त्या दोघांना पाहिल्यानंतर ते प्रेमी युगुल किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडपे असावे असेच वाटायचे. कारण एखाद्या प्रेमी युगुल, लिव्ह इनमधील जोडपेच काय...  पती-पत्नी एकमेकांची काळजी घेत नसतील तेवढी ते घेत होते. त्यामुळे त्यांच्यात निखळ मैत्रीचे नाते निर्माण झाले होते.

 मात्र काही कालावधीनंतर अधूनमधून रुसवे फुगवे सुरू झाले. दरम्यान, शिक्षण झाल्यानंतर कविताला नोकरी लागली. ती एका खाजगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी करू लागली, तर रमेशचे शिक्षणच सुरू होते. त्यांच्यात किरकोळ कारणांवरून सतत खटके उडण्यास सुरुवात झाली. ‘तो मी बोलावलेल्या वेळात येत नाही, काही सांगितले तरी ऐकत नाही,’ अशी कविताची रमेशबद्दल तक्रार. सतत भांडण होत असल्याने दोघांना आता थांबायचे होते.  पण नऊ वर्षांची निखळ मैत्री. त्यामुळे त्यांना हे नाते कसे संपुष्टात आणायचे त्यांना समजेना. मग कविता पुणे पोलिस आयुक्तालयात असणार्‍या महिला सहायक कक्षाकडे रमेशला घेऊन आली. तिने मॅडम ‘आता आमचं काही पटेना झालं आहे.

आम्हाला नातं संपवायचं आहे’, अशी तक्रार केली. पोलिसांना वाटले, हे प्रेमी युगुल किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असावेत. परंतु त्यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी ते फक्त छान मित्र असल्याचे समजले. त्यावेळी पोलिसही चक्रावून गेले. त्यांना काय सल्ला द्यावा, असा प्रश्‍न पडला. त्यांना एकमेकांना समजून घ्या, असे म्हणत मैत्रीचे नाते टिकवण्याचा सल्ला पोलिसांनी दिला. अशा प्रकारचे पुणे शहरातील पोलिसांकडे आलेले  बहुदा हेे पहिलेच प्रकरण असावे.