Wed, Apr 24, 2019 11:41होमपेज › Pune › युरोपियन महासंघासोबत मुक्त व्यापारासाठी प्रयत्न

युरोपियन महासंघासोबत मुक्त व्यापारासाठी प्रयत्न

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 1:17AM

बुकमार्क करा

पुणे ः प्रतिनिधी 

युरोपियन महासंघ ही एक सर्वात महत्त्वाची प्रादेशिक संघटना आहे. ज्याच्या माध्यमातून विविध देशांनी आपापसातील मतभेद बाजूला सारून एकत्रित येण्याचे उत्तम उदाहरण जगासमोर दर्शविले आहे. युरोपियन महासंघ हा जगातील सर्वात मोठा व्यापारी गट आहे. भारतदेखील जगात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. जगातील अनेक महत्त्वाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्रितपणे येऊन कार्य कऱण्याची गरज आहे. युरोपियन महासंघासोबत मुक्त व्यापार प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी आपले मंत्रालय प्रयत्नरत असल्याचे केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी या वेळी सांगितले. 

सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाद्वारे आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय संबंध परिषदेचे उद्घाटन शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी युरोपियन महासंघाचे भारतातील राजदूत तोमाज कोस्लोवास्की, निवृत्त राजदूत तल्मीज अहमद, परराष्ट्र सेवेतील अतिरिक्त आयुक्त गीतेश शर्मा, सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, विद्यापीठाच्या विद्या येरवाडकर, सिंबायोसिसच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या संचालिका शिवाली लवाळे आदी उपस्थित होते. 

या वेळी तोमाज कोस्लोवास्की म्हणाले की, भारत आणि युरोपियन महासंघ लोकशाही आधारित मूल्ये जपणारे नैसर्गिक मित्र आहेत. हवामान बदल, तंत्रज्ञान, संशोधन, पाणी व्यवस्थापन या विषयांवर भारत आणि युरोपियन महासंघ सहकार्य करू शकेल. तसेच युरोपियन महासंघाचे नाविक दल आणि भारतीय नौदल यांनी नुकतेच सागरी सुरक्षेबाबत संयुक्त सहकार्य कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.  या वेळी निवृत्त राजदूत तल्मीज अहमद, डॉ. शां. ब. मुजुमदार, विद्या येरवाडकर, शिवाली लवाळे यांनी मनोगते व्यक्त केली.