होमपेज › Pune › क्षयरोग रुग्णांसाठी मोफत एक्स-रे आणि पोषण आहार

क्षयरोग रुग्णांसाठी मोफत एक्स-रे आणि पोषण आहार

Published On: Mar 25 2018 1:51AM | Last Updated: Mar 25 2018 1:45AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील संशयित क्षयरोग रुग्णांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मोफत छातीचा एक्स-रे व क्षयरोगाचे निदान झाल्यास त्यांची प्रतिकारशक्‍ती वाढण्यासाठी मोफत पोषण आहार देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य क्षयरोग सोसायटीकडून 50 लाखांपेक्षा अधिक रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. क्षयरोग हा गरीब आणि श्रीमंत या दोन्ही घटकांमध्ये आढळतो. पण, गरिबांमध्ये त्याची तीव्रता जास्त आहे.

दाटीवाटीने राहणारे लोकवस्ती, पुरेशी हवा खेळती नसणे, दमट वातावरण जेथे असेल तेथे क्षयरोगाचा प्रसार झपाट्याने होतो. झोपडपट्टी, कामगार वस्ती, एमआयडीसी परिसरातील वस्त्या, स्थलांतर करणारा समाज येथे जास्त क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात. ‘मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस’ जीवाणूला जास्त पोषक वातावरण असते. गरीब रुग्णांचे जास्त प्रमाण असल्याने पैशांअभावी त्याचे निदान लवकर होत नाही; तसेच गरिबांचा आहार हा पुरेसा पोषण देणारा नसतो. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्‍ती कमी झाल्याने क्षयरोगाची लागण त्यांना लवकर होते.

या सामाजिक कारणामुळे या रुग्णांचे निदान पैशाअभावी लांबणीवर पडू नये व त्यांना पोषण आहार मिळावा म्हणून ही योजना अंमलात आणण्यात येणार असल्याची माहिती शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. मनीषा नाईक  यांनी दिली. 
 

 

 

tags : pune,news, free, X-ray,TB, patients,in pune, Municipal, corporations,