Thu, Jun 27, 2019 14:10होमपेज › Pune › महिलांच्या मसाजचे काम देण्याच्या आमिषाने गंडा 

महिलांच्या मसाजचे काम देण्याच्या आमिषाने गंडा 

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 1:36AM 

पुणे : प्रतिनिधी

पुण्यातील एका सुरक्षा रक्षकाला महिलांची मसाज आणि त्यांच्यासोबत फिरणे व मौजमजा करण्याचे काम मिळवून देण्याच्या आमिषाने गंडा घालण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्याला दररोज दहा ते पंधरा हजार रुपये मिळतील, असे सांगून त्याच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेने शहरात  खळबळ उडाली आहे.  अशा प्रकारे फसवणूक होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर उर्फ रणजीत सुभाष गोसावी (वय 28, रा. कात्रज, मूळ सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात मोबाईलधारकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोसावी हा एका शाळेमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस आहे. दरम्यान, त्याने 2017 मध्ये एका वृत्तपत्रात प्रिया पार्टटाईम क्लब अशी जाहिरात पाहिली होती. त्यात दिलेल्या क्रमांकावर फिर्यादी यांनी संपर्क केला. त्या वेळी रवि नावाची व्यक्ती त्यांच्यासोबत बोलली. तसेच, त्याने पुण्यात व इतर शहरांमध्ये तुम्हाला महिलांची मसाज करावी लागेल व त्यांच्यासोबत फिरून मौजमस्ती करावी लागेल, असे सांगितले. तसेच, त्याबदल्यात तुम्हाला दररोज दहा ते पंधरा हजार रुपये मिळतील, असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी यांचा यावर विश्‍वास बसला. त्यांनी यासाठी होकार दिला. मात्र, त्या वेळी अज्ञात मोबाईल धारकाने रजिस्ट्रेशन फीस म्हणून, एसबीआयच्या खात्यावर 500 रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर परत त्यांनी फिर्यादी यांना तुमच्या नावाने बँकेत नवीन खाते उघडायचे असून, त्यासाठी अडीच हजार रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादींनी तेही पैसे भरले. 

त्यानंतर त्यांना कात्रज बसस्टॉपवर थांबा तेथे तुम्हाला एका कारमध्ये घेऊन जाण्यासाठी मुलगी येईल, असे सांगितले. फिर्यादी तेथे जाऊन वाट पाहत थांबले. परंतु, तेथे कोणीही आले नाही. 
दरम्यान, दुसर्‍या दिवशी फिर्यादींना मसाजचे साहित्य घ्यायचे आहे. त्यासाठी दीड हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी भरले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे देऊन त्यांना एकूण 44 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, पैसे भरूनही त्यांना कोणतेही काम मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक पायगुडे हे तपास करीत आहेत.