Tue, Apr 23, 2019 14:19होमपेज › Pune › रेल्वेगेटवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गांची गरज

रेल्वेगेटवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्गांची गरज

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 12:10AMमुंढवा :नितीन वाबळे

शहरातील वाहतुककोंडी दिवसेदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यावर शाश्वत उपाययोजणा करण्याच्या दृष्टीने शहरात विविध ठिकाणी उड्डानपुल, ग्रेडसेप्रेटर व वाहनतळांसाठी पालिका आयुक्तांनी अंदाजपत्रकात 263 कोटी 9 लाख रूपयांची आर्थिक तरतुद सुचवली होती. मात्र, स्थायी समितीने त्याला कात्री लावून 225 कोटी रूपयांची तरतुद मंजूर केली आहे. प्रत्यक्षात शहरातील वाहतुक कोंडी उग्ररूप धारण करीत असताना आर्थिक तरतुद वाढविण्यापेक्षा कमी केली आहे. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी उड्डानपुल व भूयारीमार्गांचे काम मार्गी लावताना प्रशासनाचा कस लागणार आहे.

शहराच्या पुर्व भागामध्ये पुणे-मिरज आणि पुणे-सोलापूर या रेल्वेमार्गावर पालिका हद्दिमध्ये सात व ग्रामपंचायत हद्दिमध्ये एक असे आठ रेल्वेगेट आहेत. पुर्व भागातील पालिका हद्दिमध्ये समावेश झालेल्या केशवनगर, साडेसतरानळी, फुरसुंगी बरोबरच ग्रामपंचायत हद्दित असलेल्या मांजरी, शेवाळेवाडी भागामध्ये नागरीकरण वाढत आहे. व्यावसायीक, नोकरदार, शालेय विद्यार्थी आणि रुग्ण यांना शहराकडे ये-जा करावी लागते. मात्र, बहुतेक ठिकाणी रस्त्यावर रेल्वेगेट लागल्यानंतर बराच वेळ ताटकळत थांबावे लागते. त्यावेळी रेल्वेगेटच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

घोरपडी येथील साईबाबा मंदिर, अनंत चित्रपटगृह, साडेसतरानळी-केशवनगर, मांजरी, काळेपडळ, ससाणेनगर, रामटेकडी व हडपसर औद्योगीक वसाहत अशा आठ ठिकाणी रेल्वेगेट आहेत. मागील काहि वर्षांपासून या ठिकाणी उड्डानपुल किंवा भूयारी मार्ग व्हावा, अशी नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. त्यासाठी नागरिकांनी आंदोलने, उपोषणे, सह्यांची मोहीम, निवेदने यांच्या माध्यमातून या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे. याविषयी खासदार, आमदार, स्थानिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यानंतर काहि ठिकाणच्या रेल्वेगेटवर उड्डान पुल व भूयारी मार्गांसाठी भूमिपूजनही झाले आहे.

मात्र, अद्याप एकाही ठिकाणी प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली नाही ही वस्तूस्थिती आहे. महापालिकेने 2018 - 19 च्या अंदाजपत्रकात रस्ते, उड्डानपुल, बोगदे, वाहनतळ उभारण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी 225 कोटी रुपयांची तरतुद केली आहे. त्यामुळे अनेक महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लागतील अशी नागरिकांना अपेक्षा आहे. घोरपडी येथील दोन्ही उड्डानपुलासाठी निधी मंजूर झाला आहे. ते काम यावर्षी तरी मार्गी लागेल अशी आशा येथील नागरिकांना वाटत आहे. ससाणेनगर व काळेपडळ येथे भूयारी मार्ग तर मांजरी व साडेसतरानळी-केशवनगर येथील रेल्वेगेटवर उड्डानपुलाचे काम मार्गी लावण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे दिसून येत आहे. 

पुर्व भागातील आठही रेल्वेगेटवर गेट लागल्यानंतर ध्वनी आणि वायूप्रदुषण तसेच रेल्वेगेटवर बराच वेळी थांबावे लागत असल्याने अपेक्षित ठिकाणी पोहचण्यास होणार विलंब, रेल्वेगेटवरील वाहतुककोंडीत वाहनांचा धक्का लागल्यानंतर किंवा वाहने एकमेकांना घासल्यानंतर होणारी वादावादी, भांडणे यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या त्रासातून मुक्त होण्यासाठी रेल्वेगेटवर उड्डानपुल किंवा भूयारी मार्गाची आवश्यकता आहे. येथील प्रत्येक रेल्वेगेटवरील परिस्थितीचा दैनिक पुढारीमध्ये घेतलेला आढावा उद्यापासून...