Sun, May 19, 2019 14:31
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › आरटीई प्रवेशाची पहिली लॉटरी येत्या सोमवारी

आरटीई प्रवेशाची पहिली लॉटरी येत्या सोमवारी

Published On: Mar 06 2018 1:02AM | Last Updated: Mar 06 2018 12:47AMपुणे : प्रतिनिधी 

राज्यात शिक्षण हक्‍क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के आरटीई प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्यासाठी बुधवार, दि. 7 मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्यांदा अहमदनगर जिल्ह्यासाठी आणि येत्या सोमवार, दि.12 रोजी संपूर्ण राज्यासाठी आरटीई प्रवेशाची पहिली लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. 

राज्यात दरवर्षी राबविण्यात येणारी आरटीई प्रवेश प्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. एकीकडे शिक्षण विभागाने आरटीई अर्जांची नोंदणी जवळपास दोन लाख होण्याची शक्यता वर्तविली असून प्रवेशाची पहिली लॉटरी काढण्याची तयारीदेखील केली आहे. परंतु आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यार्‍या शाळांना 2012 पासून देण्यात येणारी शुल्कप्रतीपूर्ती मोठ्या प्रमाणात थकली आहे.

त्यामुळे इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन अर्थात ‘इसा’ या संघटनेने न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने सकारात्मक निर्णय दिला असून प्रवेशास येत्या 14 मार्चपर्यंत अंतरिम स्थगिती दिली असून ज्या शाळा प्रवेश करणार नाहीत त्यांच्यावर शासनाला कोणतीही कारवाई करता येणार नसल्याची माहिती संघटनेचे सचिव राजेंद्र सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यात 8 हजार 980 शाळांमध्ये प्रवेशाच्या 1 लाख 26 हजार 128 जागा उपलब्ध असून सोमवार, दि. 5 मार्चपर्यंत 1 लाख 72 हजार 488 अर्ज भरून पूर्ण झालेले दिसून येत आहेत. उद्या दि. 7 मार्चपर्यंत विद्यार्थी  तसेच पालकांना अर्ज भरता येणार आहेत.  त्यानंतर मात्र अर्ज भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही.