होमपेज › Pune › विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार

विद्यापीठ चौकात भरदिवसा गोळीबार

Published On: Aug 19 2018 1:29AM | Last Updated: Aug 19 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी

शहरातील महत्त्वाचा आणि कायम वर्दळीचा चौक असणार्‍या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात सकाळी सिग्नलवर उभारलेल्या तरुणावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी सकाळी घडला. पाठीमागून दुचाकीवर येऊन जवळून गोळी झाडण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर पाषाणच्या दिशेने पसार झाला.  

ऐन वर्दळीच्या वेळीच हा गोळीबार झाल्यानंतर चौकात चांगलाच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या प्रकाराने प्रत्यक्षदर्शींच्याही अंगाचा थरकाप उडाला.  दरम्यान, दुपारी हिंजवडी पोलिसांच्या मार्शलने हल्लेखोराला पकडले. 

समीर किसन येनपुरे (वय 39, रा. गणेशनगर, मेंहदळे गॅरेज, एरंडवणा) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शुक्राचार्य बसवंत मडाळे (वय 42, रा. मेेंहदळे गॅरेज, चाळ नं. 7, एरडंवणा) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे असून, एकाच भागात राहणारे आहेत. समीर याचा बोर्ड, तसेच फ्लेक्स लावण्याचा व्यवसाय आहे. तर, शुक्राचार्य याची मेेंहदळे गॅरेज येथील अभिषेक हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला पानटपरी आहे. 

समीर हा शुक्राचार्याला टपरी चालविण्यासाठी मागत होता; मात्र शुक्राचार्य देत नव्हता. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. एक ते दीड महिन्यांपूर्वी महापालिका अतिक्रमण विभागाने या पान टपरीवर कारवाई करत, ती तेथून काढली. त्यावेळी आरोपीला समीरनेच ही कारवाई करण्यास सांगितल्याचा गैरसमज झाला. त्यावरून तो समीरवर चिडलेला होता. 

शनिवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास समीर येनपुरे हा त्याच्या दुचाकीवरून खासगी कामानिमित्त नळ स्टॉपवरून सांगवीला निघाला होता. तो लॉ कॉलेज रस्त्यावरून सेनापती बापट रोडने विद्यापीठ चौकात गेला. त्यावेळी तेथील सिग्नल लागल्याने तो थांबला. त्यादरम्यान अचानक पाठीमागून  दुचाकीवरून आलेल्या एकाने पिस्तूल काढून त्याच्यावर रोखत गोळी झाडली. सुदैवाने गोळी डोक्याच्या पाठीमागून चाटून गेली. त्यानंतर हल्लेखोर पाषाणच्या दिशेने पसार झाला. 

पोलिसांना माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, परिमंडळ चारचे उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे, उपनिरीक्षक प्रेम वाघमोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. दरम्यान, नागरिकांनी व पोलिसांनी जखमी समीर यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले; तसेच आरोपींचा शोध सुरू केला.