Thu, Jul 18, 2019 04:30होमपेज › Pune › पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मंडळांचे मंडप बेकायदा

पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मंडळांचे मंडप बेकायदा

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 12 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी

सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप, कमानी आणि रनिंग मंडपाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुलभ केल्यानंतरही शहरातील सत्तर टक्के मंडळांनी अद्याप परवानगी घेतलेली नाही. गणेशोत्सवासाठी रस्त्यावर मंडप पडल्यानंतर आणि परवानगी देण्याची मुदत संपल्यानंतरही परवानगीची प्रक्रिया पालिकेकडून सुरू ठेवण्यात आली. असे असतानाही 1134 गणेश मंडळांनीच मंडपाच्या परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे शहरातील पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मंडळांनी बेकायदेशीर मंडप उभारल्याचे समोर आले आहे. 

सार्वजनिक समारंभ आणि उत्सवासाठी रस्त्यावर तसेच पदपथांवर उभारण्यात येणार्‍या मंडपासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने ‘मंडप धोरण’ तयार केले आहे. या धोरणानुसार या प्रक्रियेचे पालन करणे मंडळांना बंधनकारक आहे. उत्सवापूर्वी पाच दिवस आधी ही परवानगी घेणे आवश्यक आहे. मंडपाची लांबी, रुंदी, उंची या बाबीही धोरणामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. मंडप, कमान, रनिंग मंडप यांना परवानगी देण्यासाठी पालिकेने ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, परवानगी घेण्याकडे मंडळांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. 

पालिकेच्या आकेडवारीनुसार मंगळवारपर्यंत (11 सप्टेंबर) या दोन्ही पद्धतीने अवघ्या 1 हजार 34 मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी पालिकेकडे अर्ज केले आहेत. यापैकी 557 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. तर कमानींसाठी 147, रनिंग मंडपसाठी 74 आणि विक्रीच्या स्टॉलसाठी 293 अर्ज आले आहे. दरम्यान, परवानगी घेणार्‍या मंडळांची सर्वाधिक संख्या ही वडगावशेरी परिसरात आहे.