Wed, May 22, 2019 10:27होमपेज › Pune › रंगात रंगली तरुणाई....

रंगात रंगली तरुणाई....

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 12:28AMपुणे : प्रतिनिधी

होळी अणि धूलिवंदनानंतर तरुणांचा आवडता सण म्हणजे रंगपंचमी. यादिवशी शहरात ठिकठिकाणी लाल, निळा, भगवा, हिरवा, गुलाबी, पोपटी, जांभळा यांसारख्या रंगात तरुणाई रंगलेली पाहायला मिळाली.  होळी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी धूलिवंदन आणि लगेचच रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे हे बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात.

आणि एकमेकांवर वेगवेगळ्या रंगांची उधळण करतात. अशीच रंगांची उधळण शहरातील मध्यवस्ती भागातील महाविद्यालये, शाळांच्या आवारात पाहायला मिळाली. कोरड्या रंगाने माखलेले शाळा, महाविद्यालयांचे प्रांगण, रस्त्यांवर रंगाचे सडे असे रंगमय वातावरणात तरुणाईने धुंद होऊन रंगाच्या या अनोख्या सणाचा आनंद लुटला; तसेच अनेक तरुण-तरुणींनी रंग खेळून शहरात दुचाकींवर फिरून आनंद व्यक्त केला. 

मागील सलग दोन वर्षांत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई जाणवत होती. याच्या पार्श्‍वभूमीवर जागरूक तरुणांनी पाण्याचा अपव्यय टाळत कोरड्या रंगाने रंगपंचमी साजरी केली. महाराष्ट्रात दुष्काळाचे वातावरण पुन्हा निर्माण होऊ नये, याकरिता पाण्याचा वापर टाळा, असे आवाहन सामाजिक संघटना, महाराष्ट्र शासन, प्रसारमाध्यम यांच्याकडून करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत तरुण-तरुणी कोरड्या रंगाने रंगपंचमी साजरी केले.

 शहरातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, सदाशिव पेठ, टिळक रस्ता, मध्यवस्तीत तरुण बाईकवर फिरत एकमेकांवर रंग टाकताना दिसले. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, शिवाजीनगर, सेनापती बापट रस्ता, महाविद्यालयांच्या आवारात चेहर्‍याला रंगरंगोटी केलेले युवक-युवती दिवसभर पाहायला मिळत होते.