होमपेज › Pune › पोलिसाला मोक्का कोठडी

पोलिसाला मोक्का कोठडी

Published On: Dec 20 2017 2:38AM | Last Updated: Dec 20 2017 2:04AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना आर्थिक फायद्यासाठी पळून जाण्यास बेकायदेशीरपणे मदत करून पोलिसांत खोटी तक्रार देणार्‍या पोलिसाला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  विशेष मोक्का न्यायाधीश जे. पी. उत्पात यांनी हा आदेश दिला आहे.

 संजय काशिनाथ चंदनशिवे (रा. दत्तनगर, आंबेगाव) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे.  तो पोलिस खात्यात नोकरीस आहे. तर, संतोष उर्फ लुंब्या चिंतामणी चांदीलकर (वय 36, रा. लवळे, मुळशी), राजू उर्फ काल्या महादेव पात्रे (वय 31, रा. विद्यानगर, चिंचवड), गिड्या उर्फ विशाल नागू गायकवाड (वय 31, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली), मनजीत उर्फ आबा मानसिंग सावंत (वय 26, रा. सांगली), गणेश रघुनाथ अहिवळे (वय 35, रा. मोरवाडी, पिंपरी), विनयकुमार रामसिंग कुर्मी (वय 33, रा. मोरवाडी, पिंपरी), हमीद नवाब शेख (वय 36, रा. खराळवाडी, पिंपरी), सचिन जयविलास जाधव (वय 34, रा. खळवाडी, पिंपरी), सुरेश स्वामीनाथ झेंडे (वय 29, रा. थेरगाव), विजय रामदास वाघमारे (वय 38, रा. वानवडी) या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

सुशील हरिश्‍चंद्र मंचरकर (50, रा. नेहरुनगर, पिंपरी) हा जामिनावर आहे. चंदनशिवे याने न्यायालयीन कोठडीत असलेल्यांना येरवडा कारागृहातून सातारा न्यायालयात हजर केले. मात्र, न्यायालयातून परत आणताना त्यांना आर्थिक फायद्यासाठी पलायन करण्यास सहकार्य केले. तसेच न्यायालयीन कोठडीतील आरोपी चकवा देऊन पळून गेल्याची खोटी तक्रार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दिली. संजय चंदनशिव याने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तपास केला. त्यात चंदनशिवे याने खोटी तक्रार दिल्याची माहिती समोर आली.

तसेच जामिनावरील असलेला सुशील मंचरकर याने राजकीय वैमनस्यातून कैलास कदम याचा काटा काढण्यासाठी गुन्ह्यातील इतर आरोपींसह येरवडा कारागृहात खुनाचा कट रचला. त्यासाठी लुंब्या, काल्या आणि संतोष जगताप यांना 30 लाख रुपयांची खुनाची सुपारी दिली. तसेच, पूर्वनियोजन करून या आरोपींची खेड-शिवापूर फाट्याजवळील हॉटेलमध्ये भेट घेऊन जेवण केले. त्यात पोलिस पार्टीतील कर्मचार्‍यांनी इतर कर्मचार्‍यांबरोबर जेवण करून दारू पिले.   त्यानंतर तिन्ही आरोपी व पोलिस पार्टीतील कर्मचारी सुभाष खाडे व शंकर कोकरे खासगी कारमधून पिंपरी येथे आले. त्यानंतर तेथून पलायन केले. तसेच आरोपी मंचरकर याने पलायन केलेल्या आरोपींना कैलास कदम याचे राहते घर व तो दर्शनासाठी जात असलेले मंदिर दाखवले. त्याचप्रमाणे आरोपींना 5 लाख रुपये, पिस्तूल व मोबाईल पुरवले. त्यातूनच आरोपींनी संघटित गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.