Tue, Apr 23, 2019 21:33होमपेज › Pune › कर्जरोख्यांनी शेअर बाजाराला रोखले

कर्जरोख्यांनी शेअर बाजाराला रोखले

Published On: Feb 07 2018 1:46AM | Last Updated: Feb 07 2018 1:45AMपुणे  :प्रतिनिधी

अ मेरिकी कर्जरोख्यांच्या उत्पन्‍नामध्ये झालेली भरघोस वाढ ही जगभरातील शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरली आहे. अमेरिकी कर्मचार्‍यांचे पगार अत्यंत वेगाने वाढत असून, 2009 नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे महागाई वाढेल आणि व्याज दरही वाढतील, असा अंदाज असून परिणामी शेअर बाजारातील गुंतवणूक आतबट्ट्याची ठरू शकते, असा विचार करून बाजारात विक्रीचा जोर दिसला. जिरॉम पॉवेल यांनी अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या चेअरमनपदाचा कार्यभार सांभाळताच बाजारात पडझड झाली, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. कर्जरोख्यांमधील उत्पन्‍न वाढण्याची घटना जर्मनीमध्येही दिसून आली आहे. तसेच भारतातही यामध्ये गेल्या 10 वर्षांतील सर्वात जास्त वाढ झालेली आहे. देशात 10 वर्षांचे बाँड यील्ड जुलै 2017 मध्ये 6.3 टक्क्यांनी वाढून वर्षभरात 7.6 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

कर्जरोख्यांचे उत्पन्‍न वाढल्यावर अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावतो, असा अनुभव आहे. गृहखरेदी व इतर वस्तूंची खरेदी महाग होऊ लागते. बाजारातील पतपुरवठा कमी झाल्याने त्याचेही परिणाम दिसू लागतात, असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. सोमवारी डाओ जोन्स 1,175.2 अंक म्हणजेच 4.6 टक्क्यांच्या घसरणीसह 24,345.75 वर बंद झाला. एस. अँड पी. 500 भांडवली निर्देशांक 3.8 टक्के आणि नेस्डेक 3.7 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयानेही शेअर बाजारातील घडामोडींवर चिंता व्यक्‍त केली आहे. बाजारपेठांतील पडझडींमुळे आम्हाला नेहमीच चिंता वाटते, अर्थात अमेरिकेची अर्थव्यवस्था मजबूत आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

बजेटनंतर शेअर बाजारातील घसरण

1 फेब्रुवारी : सेन्सेक्स 35,906 (-59 अंश) आणि निफ्टी 11,010 (-10 अंश) 2 फेब्र्रुवारी : सेन्सेक्स 35,067 (-840 अंश), निफ्टी 10, 761 (-256 अंश) 5 फेब्रुवारी ः सेन्सेक्स 34,757 (-310 अंश), निफ्टी 10,667 (-94 अंश) 6 फेब्रु्रवारी : प्रारंभीच्या कारभारात सेन्सेक्स 1,200 अंशांनी कोसळला. 2,164.11 : बजेटनंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 2164.11 अंशांनी कोसळला आहे. 
9 लाख 90 कोटी : गेल्या सहा दिवसातील घसरणीमुळे कंपन्यांच्या बाजार भांडवलाचे मुख्य 1,45,22,830 वरून 9, 90, 476.93 कोटी रुपयांवर घसरले आहे.