Tue, Nov 13, 2018 08:04होमपेज › Pune › फेसबुकवर मैत्री करून ज्येष्ठाला एक लाख ६४ हजारांचा गंडा

फेसबुकवर मैत्री करून ज्येष्ठाला एक लाख ६४ हजारांचा गंडा

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 24 2017 12:51AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

ज्येष्ठ नागरिकाशी फेसबुकवर मैत्री करत लंडन येथील व्यवसायिक असल्याचे सांगितले. त्यानंतर व्यवसायानिमित्त पुण्यात येत असल्याचे सांगून विश्‍वास संपादन केला. दिल्ली येथे कस्टम अधिकार्‍यांनी रक्कम व वस्तू ताब्यात घेतल्याचे सांगून ते सोडविण्यासाठी एक लाख 64 हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञातावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यासंदर्भात नारायण पेठेत राहणार्‍या एका साठ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नारायण पेठ येथे राहण्यास आहेत. त्यांना फेसबुकवर सुंदर विदेशी तरुणीचा फोटो डीपी असलेल्या मेरलीन रजर नावाच्या प्रोफाईलवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली.

त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर त्यांची चॅटींग सुरू झाली. त्यावेळी आपण लंडन येथील व्यावसायिक असल्याचे सांगून व्यवसानिमित्त व फिर्यादी यांना भेटण्यासाठी ती पुण्यात आली असल्याचे भासवले. त्यानंतर त्यांचा विश्‍वास संपादन करून फिर्यादी यांना आपण दिल्ली येथे आलो असल्याचे भासवले. दिल्ली येथे कस्टम विभागाने आपले पैसे व वस्तू ताब्यात घेतले असल्याचे इमेल फिर्यादींना केले. ते सोडविण्यासाठी मदत करण्याचे भावनिक संभाषण तिने फिर्यादींना केले. त्यानंतर फिर्यादी यांना वेगवेगळ्या कारणांनी पैसे भरण्यास लावले फिर्यादी यांनी एक लाख 64 हजार 500 रुपये तिच्या खात्यावर भरले. हा सर्व प्रकार एक ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान घडला. मात्र पैसे भरल्यानंतर त्यांच्याशी संपर्कच बंद केला. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी विश्रामबाग पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  अधिक तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.