Sun, Aug 18, 2019 14:41होमपेज › Pune › आता गावोगावी  उघडणार फेसबुकचे पेज

आता गावोगावी  उघडणार फेसबुकचे पेज

Published On: Feb 27 2018 1:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:19AMपुणे :  प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या वतीने फेसबुक पेजच्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांची इत्थंभूत माहिती तत्काळ उपलब्ध होण्यासाठी ‘फेसबुक व्हिलेज बुक’ तयार करण्यात येणार आहे़  त्यासंदर्भात अधिकार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. पेजद्वारे गावातून दूर राहणार्‍या भूमिपुत्रांना गावची माहिती व्हावी, गावात राबविण्यात येणार्‍या योजना; तसेच ऐतिहासिक गावाची यशोगाथा, यांसह अनेक बाबींचा समावेश करण्यात येणार आहे, अशी माहिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली. दिवसेंदिवस बदलणार्‍या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांसह इतरांना करण्यासाठी गावोगावचे फेसबुक पेज तयार करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. सरकारी कामकाजातही तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे़

 नवनवीन कल्पनाच्या माध्यमातून कामकाज केले जात आहे़  सरकारी योजनांची माहिती, संदेश गावागावात पोहोचविता येण्यासाठी फेसबुकची मदत घेण्यात येत आहे़  जगाच्या विविध कोपर्‍यातील नागरिकांना गावाशी संपर्क साधता यावा, गावाची माहिती मिळावी, यासाठी गावाचे फेसबुक पेज तयार केले जाणार आहे़  या पेजमध्ये गावाची सर्व माहिती दिली जाणार आहे़  सरकारी योजना, गावातील योजनांच्या माहितीसह अन्य महत्त्वाची माहिती या पेजवर एका क्लिकवर पाहता येणार आहे.

जिल्ह्यातील 1 हजार 407 ग्रामपंचायतींचे पेज तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या हालचाली सुरू आहेत़  जिल्ह्यात ही कार्यवाही लवकरच केली जाणार आहे. त्यासाठी गटविकास अधिकार्‍यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जाणार आहेत़  प्रशिक्षणात अधिकार्‍यांना माहिती देऊन पेज तयार केले जाणार आहेत़; तसेच पंचायत समित्यांचेही व्हिलेजबुक पेज तयार होणारआहे़  पेजवर व्हिडीओ कॉलिंग, कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे़  या सुविधेमुळे महत्वाच्या बैठका असल्यास प्रत्येक वेळी ग्रामसेवक किंवा गटविकास अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेत येण्याची गरज भासणार नाही.