Tue, Nov 20, 2018 06:08होमपेज › Pune › दर घटल्याने साखर निर्यात अशक्यच

दर घटल्याने साखर निर्यात अशक्यच

Published On: Mar 07 2018 1:55AM | Last Updated: Mar 07 2018 1:48AMपुणे : प्रतिनिधी

देशात चालूवर्षी साखरेचे उत्पादन 251 वरून 275 ते 280 लाख टन  होणार असल्याचे ताज्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखरेचे भाव अपेक्षित प्रमाणात न वाढता मंदीकडे झुकलेले आहेत. साखरेवरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवून अनुदान देऊन साखर निर्यातीची मागणी होत आहे. मात्र, भारतात साखरेचे दर क्‍विंटलला करविरहित 3,000 ते 3,050 रुपये असून, जागतिक बाजारात हेच दर 2,340 रुपयांपर्यंत खाली आलेले आहेत. अशा स्थितीत देशातून साखर निर्यात केवळ अशक्यच असल्याचे चित्र उभे राहिले आहे. चालूवर्षीच्या ऊस गाळप हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे हंगाम 2017-18 मध्ये साखरेचे 251 लाख टन उत्पादन अपेक्षित धरण्यात येत होते. गतवर्षीचा साखरेचा शिलकी साठा 40 लाख टनांचा असून, वार्षिक खप 250 लाख टनांच्या आसपास आहे.

जागतिक बाजारात साखरेचा प्रतिटनाचा भाव 360 डॉलर्स इतका आहे. त्याचा विचार करता 23 हजार 400 रुपये टन म्हणजेच क्‍विंटलला 2,340 रुपये भाव होतो. भारतात हे दर 3,050 रुपये आहेत. याचा विचार करता निर्यातीला निश्‍चित अडचणी आहेत. म्हणून केंद्र सरकारने साखरेवरील 20 टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे, तसेच केंद्र सरकारने 2015 सालाप्रमाणे देशातील प्रत्येक कारखानानिहाय साखर निर्यातीचा कोटा द्यावा आणि उसाला प्रतिटनास 75 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिल्यास आपण जागतिक बाजाराशी स्पर्धा करू शकतो.

- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक,   राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ