Thu, Apr 25, 2019 23:47होमपेज › Pune › निर्यातबंदी उठवल्याने कांद्याला भाव

निर्यातबंदी उठवल्याने कांद्याला भाव

Published On: Feb 05 2018 9:47AM | Last Updated: Feb 05 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यातमूल्य शून्य करीत निर्यातबंदी उठविली आहे. त्याचा परिणाम म्हणजे कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मालाला अपेक्षित भाव मिळण्यास सुरुवात झाली असून, मार्केटयार्ड येथे आलेल्या कांद्याच्या दरामध्येही किलोमागे पाच ते सहा रुपयांची वाढ झाली आहे. गुलटेकडी मार्केटयार्ड येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड येथील कांदा-बटाटा विभागामध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. आवक जास्त असल्याने शेतकर्‍यांच्या कांद्याला अपेक्षित भाव मिळत नव्हता; त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. शासनाने अखेर याची दखल घेऊन निर्यातबंदी उठवली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या बाजारात कांद्याची आवक कमी होऊ लागली आहे. परिणामी कांद्याच्या दरात काही प्रमाणात का होईना वाढ झाली.

रविवारी बाजारात कांद्याची 200 ट्रकची आवक झाली असून, दहा किलोला 170 ते 210 रुपये भाव मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वी याच कांद्याची 250 ट्रकची आवक; तर दर 170 ते 180 रुपये प्रति दहा किलोला बाजारभाव मिळाला होता. आगामी काळात कांद्याची निर्यात वाढल्यास स्थानिक बाजारातही कांदा उत्पादक शेतकर्‍यांना चांगला दर मिळेल अशी आशा आहे. याबाबत कांद्याचे व्यापारी रितेश पोमण म्हणाले की, केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी उठविल्याने कांद्याच्या दरात किलोमागे 5 ते 7 रुपयांची वाढ झाली असून, शेतकर्‍यांना त्याचा फायदा होत आहे. रविवारचा दिवस असूनही कांद्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी झाली. आगामी काळात कांद्याची आवक जेमतेमच होण्याची शक्यता असून, कांद्याला आणखी चांगला दर मिळू शकेल.

कांद्याचे व्यापारी विलास रायकर म्हणाले, अनेक वेळा शेतकरी कांदा विक्रीसाठी घाई करून कच्चे कांदे बाजारात आणत होते; त्यामुळे त्या कांद्यालाही अपेक्षित बाजारभाव मिळत नव्हता. निर्यातबंदी उठविल्याने आता शेतकरीही कांदा बाजारात थांबून पाठवतील. बाजारात आवकही कमी राहील. त्यामुळे आगामी काळात कांद्याची प्रतही चांगली असेल आणि शेतकर्‍यांना चांगला भावही मिळेल.