Tue, Jul 23, 2019 18:49होमपेज › Pune › कौशल्य विकास शिक्षणाच्या विस्ताराची गरज

कौशल्य विकास शिक्षणाच्या विस्ताराची गरज

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी  

एकीकडे विविध क्षेत्रातील उद्योगांंची कौशल्य असलेल्या कामगारांचा तुठवडा भासत असल्याची तक्रार करत आहेत. तर दुसरीकडे रोजगाराची संधी मिळत नसल्याने तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे वातावरण आहे. अशा परस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शिक्षण संस्थानी पुढाकार घेऊन कौशल्य विकास शिक्षणाच्या विस्तारासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी केले. 

अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेतर्फे राजर्षी शाहू अ‍ॅकडमी स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शशिकांत सुतार, भारत विकास ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, एमपीएससीचे माजी अध्यक्ष मधुकर कोकाटे, सरचिटणीस प्रमिला गायकवाड आदी उपस्थित होते. 

यावेळी शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्या वेळी 1947 ला मंबई राज्यात शिक्षण घेणार्‍यांची संख्या 30 हजार होती. मात्र, राज्यात सध्या 60 हजारांपेक्षा जास्त शिक्षण संस्था कार्यरत असून उच्च शिक्षण घेणार्‍यांची संख्या 30 लाखांवर गेली आहे. मात्र, आजच्या परस्थितीत उद्योगधंद्यांना आवश्यक कौशल्य असणारे मनुष्यबळ मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी शौक्षणिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कौशल्य विकास शिक्षणाचा विस्तार होण्याची गरज आहे.

 राजर्षी शाहू महाराज अ‍ॅकडमीच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध शिक्षण संस्थाच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे केंद्र उभा करण्याची गरज आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षांविषयी मार्गदर्शन केंद्रही उभे करणे आवश्यक आहे. देशाचे पंतप्रधान कौशल्य विकासाचा उल्लेख व चर्चा भाषणात करत आहेत. यामध्ये मंत्रालय लक्ष घालताना दिसत आहे.

मात्र, देशात फक्त 8 टक्के कौशल्य विकास झाला असून दक्षिण कोरिया सारख्या देशात 92 टक्के तरुण कौशल्यामध्ये पारंगत आहेत. दक्षिण कोरियाने देशाचं कौशल्य विकास केंद्र उभा केले आहे. इनोव्हेशन संधी आणि ज्ञान उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात नाविण्यापूर्ण काम करणे आवश्यक असून नवीन संशोधनावर भर देण्याची गरज आहे. केंद्र सरकार, व त्यातही पंतप्रधान कौशल्य विकासाविषयी आग्रही दिसत आहेत. मात्र त्यांच्या योजना क्रुतीत यायला हव्यात अशी अपेक्षा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.