होमपेज › Pune › विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांवरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये

विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांवरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये

Published On: Feb 07 2018 1:47AM | Last Updated: Feb 07 2018 1:14AMपुणे : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यात येत्या फेब्रुवारी- मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केलेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवावा. अन्य सोशल माध्यमांद्वारे प्रसारीत होणार्‍या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.
फेब्रुवारी - मार्च महिन्यात राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण आदी विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परिक्षा घेण्यात येत आहेत. मंडळाने परिक्षांच्या तारखा संकेतस्थळावर जाहिर केल्या आहेत. बारावीच्या लेखी परिक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या परिक्षा 1 मार्च ते 24 मार्च 2018 या कालावधीत होणार आहेत.

परिक्षेच्या कालावधीत खासगी क्लासेस जाहिरातीसाठी परिक्षेचे वेळापत्रक छापतात आणि त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करतात. तसेच व्हॉट्सअप, फेसबुक इन्स्टाग्राम आदी सोशल माध्यमांद्वारे त्याचा प्रसार केला जातो. अनावधानाने हे वेळापत्रक छापताना किंवा त्याचा प्रसार करताना चुका घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ राज्य शिक्षण मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा. अन्य सोशल माध्यमातील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे अवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.