Thu, Apr 25, 2019 11:30होमपेज › Pune › शैक्षणिक संस्था-क्‍लासचालकांची मिलीभगत

शैक्षणिक संस्था-क्‍लासचालकांची मिलीभगत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : गणेश खळदकर 

राज्यात दुहेरी आणि इंटीग्रेटेड क्‍लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची लुट होत असतानाच आता परराज्यातील क्‍लासेसबरोबर महविद्यालयांमध्येच जेईई, आयआयटी, नीट परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली फाऊंडेशन कोर्सचे आयोजन विविध महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून तब्बल 20 हजार ते 80 हजार शुल्क आकारण्यात येत आहे. शाळांमध्ये शिकवणी वर्ग चालविणे तसेच शिक्षकी पेशात काम करणार्‍या शिक्षकांनी शिकवणे हे शासनाच्या नियमांच्या विरोधात असताना व त्याविरोधात उच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश असताना देखील कारवाई होताना दिसत नाही.

तर शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडे अशा लोकांची व संस्थांची यादी असून देखील अधिकारी कारवाईच करत नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण करणार्‍या खासगी क्‍लासेसवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र खासगी शिकवणी (विनियमन) अधिनियम 2018 चा कायदा तयार करण्यासाठीचा कच्चा मसुदा बुधवारी अंतिम करण्यात आला आहे. लवकरच तो शासनाकडे पाठविण्यात देखील येणार आहे.

परंतु अधिकार्‍यांच्या अनास्थेमुळे क्‍लासचालक आणि शिक्षणसंस्था मिळून विद्यार्थ्यांची लूट करत असल्याचे दिसून येत आहे.जुन्नरमधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार मिळवणार्‍या एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्याने एक पत्रक काढले आहे. यामध्ये जेईई, आयआयटी,  नीट परीक्षांच्या तयारीसाठी कोटा राजस्थान येथील मोशन अ‍ॅकडमी व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने फाऊंडेशन कोर्सचे आयोजन केले असल्याचे  कळवले आहे.

 यामध्ये सातवी-आठवी साठी वर्षभरासाठी 20 हजार, नववी-दहावी साठी वर्षभरासाठी 25 हजार, तर अकरावी-बारावीच्या इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी 75 हजार रूपये मेडीकलसाठी 75 हजार रूपये तर दोन्हींसाठी 80 हजार रूपये शुल्क ठेवण्यात आल्याचे कळवले आहे. तर जुन्नरमधीलच आणखी एका महाविद्यालयाने आजच प्रवेश घ्या व करीअरविषयी निश्‍चिंत व्हा अशा आशयाने क्‍लासेस साठीचे पत्र काढले आहे.

दैनिक पुढारीने 22 मार्च रोजी गैरप्रकारांमध्ये गुरूजींचा सहभाग या मथळ्याखाली शाळांमध्येच शिकवणी वर्ग चालवणार्‍या आणि महाविद्यालयांमध्ये महाविद्यालयाच्या तासिकेशिवाय महाविद्यालयाच्या परिसरातच वेगळे शुल्क घेवून इंटीग्रेटेड क्‍लासेस चालविणार्‍या गुरूजींचाच दहावी-बारावी गैरप्रकारात सहभाग असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर खासगी क्‍लासेसवर नियंत्रण आणणार्‍या समितीचे सदस्य व प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बंडोपंत भुयार यांनी अशा क्‍लासचालकांची यादी देखील माध्यमिकचे संचालक गंगाधर म्हमाणे यांच्याकडे दिली होती.परंतु शिक्षण विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. 

कारवाई होत नसल्यामुळे आणि होणारी कारवाई तुटपूंजी असल्यामुळे महाविद्यालये आणि खासगी कोचींग क्‍लासेस मिलीभगत करून विद्यार्थ्यांची लुट करत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात माध्यमिकचे संचालक तसेच महाराष्ट्र खासगी शिकवणी (विनियमन) अधिनियम 2018 समितीचे सचिव गंगाधर म्हमाणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
 

 

 

tags ; pune,news,educational, institutions,classs, tudents ,loot,


  •