Tue, Jun 25, 2019 14:08होमपेज › Pune › डॉक्टरांच्या संपाला शहरात संमिश्र प्रतिसाद

डॉक्टरांच्या संपाला शहरात संमिश्र प्रतिसाद

Published On: Jan 03 2018 1:16AM | Last Updated: Jan 03 2018 12:19AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी

‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे विधेयक लागू करण्याच्या विरोधात आज देशभरातील सुमारे तीन लाख डॉक्टरांनी ‘काळा दिवस’ पाळला, याला शहरातील रुग्णालयांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून बाह्यरुग्ण विभाग व इतर विभाग थोड्या वेळासाठी सूरू होते. दरम्यान, एनएमसी विधेयक केंद्र सरकारने पुनर्विचारासाठी संसदेच्या स्थायी समितीकडे सुपूर्द केल्यानंतर डॉक्टरांनी संप मागे घेतला. 

वैद्यकीय सेेवेेचे नियमन करण्यासाठी ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ (एमसीआय) या वैधानिक परिषदेऐवजी केंद्र सरकारने ‘एनएमसी’ हे विधेयक संसदेत सादर केले आहे. परंतु, या नवीन विधेयकाचा मसुदा रुग्ण व लोकशाहीविरोधी आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षण महाग होईल आणि भ्रष्टाचार वाढेल, असे अनेक आक्षेप नोंदवत देशातील डॉक्टरांच्या आयएमए या संघटनेने मंगळवारी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत काळा दिवस पाळला. या संपामध्ये राज्यातील 40 हजार, तर पुण्यातील साडेचार हजार डॉक्टर सहभागी झाले होते. दरम्यान, शहरातील काही खासगी रुग्णालयांनी बाह्यरुग्ण विभाग बंद केले होते. यामुळे बर्‍याच रुग्णांची गैरसोय झाली, तर काही रुग्णालयांनी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून बाह्यरुग्ण विभाग आणि इतर सेवा दुपारी चार वाजेपासून सुरू केल्या  होत्या.