Wed, Jan 23, 2019 07:19होमपेज › Pune › निष्काळजीपणामुळेच दवेचा मृत्यू

निष्काळजीपणामुळेच दवेचा मृत्यू

Published On: Jan 04 2018 2:03AM | Last Updated: Jan 04 2018 1:44AM

बुकमार्क करा
 पुणे ः प्रतिनिधी

पर्वती येथील चैतन्य हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान दीपक दवे या तरूणाचा मृत्यू डॉक्टरांच्याच निष्काळजीपणामुळे झाला असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी रुग्णालयातील तीन डॉक्टरांवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   डॉ. अनंत एकनाथ बागुल (वय 54, रा. पर्वती), डॉ. सचिन जमादार (वय 35, रा. कात्रज) आणि डॉ. विशाल रविंद्र भंडारी (वय 36, रा. संतनगर, अरण्येश्‍वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. त्यांच्यावर भादवि कलम 304-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) यानुसार गुन्हा दाखल केला आहे.  

   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मीनगर, पर्वती येथे राहणार्‍या दीपक कांतीलाल दवे (वय 29) हा 14 जून 2017 ला घरी दुचाकी स्टँडवर लावताना उजव्या हातावर पडला होता. यामध्ये त्याच्या कोपराला दुखापत झाली होती. त्यावर उपचार करण्यासाठी तो दुसर्‍या दिवशी 15 जूनला निलायम पुलाजवळील सिंहगड रोडवरील चैतन्य हॉस्पिटल येथे सकाळी साडेअकरा वाजता गेला होता. तेथे त्याला डॉक्टरांनी हाताचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले.

यानुसार त्याला डॉ. विशाल भंडारी यांनी भूल दिली. पण नंतर तो भूलीतून बाहेर आला नाही. दरम्यान त्याला चैतन्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सायंकाळी पाच वाजता डेक्कन येथील सहयाद्री रुग्णालयात हलविण्यात आले. पण तेथे तासाभरात त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप दीपकच्या नातेवाईकांनी केला होता. त्यामुळे त्याचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले व व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता.

तसेच नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत दत्तवाडी पोलिसांकडे तक्रार दिली होती.     यानंतर दत्तवाडी पोलिसांनी नातेवाईकांचा जबाब व दीपकवर उपचार केलेली कागदपत्रे ससून रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डकडे पाठवून दिली होती. यावर ससून रुग्णालयाच्या मेडिकल बोर्डच्या समितीने या प्रकरणातील  कागदपत्रांची पाहणी करून दत्तवाडी पोलिसांना पत्र दिले होते. ससूनची कागदपत्रे व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून हा  गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती  पोलिसांनी दिली.