Mon, Jul 22, 2019 04:53होमपेज › Pune › हिजडा शिवी नाही संस्कृती आहे दिशा शेख  यांचा हृद्यसंवाद  

हिजडा शिवी नाही संस्कृती आहे दिशा शेख  यांचा हृद्यसंवाद  

Published On: Jan 06 2018 1:40AM | Last Updated: Jan 05 2018 11:47PM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी 

हिजडा शिवी नाही तर संस्कृती आहे. त्यामुळे भांडणे होत असतील तर हिजड्यांना मध्ये का आणता असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. हिजडा ही परंपरा, संस्कृती समाजाने बहिष्कृत केली असून त्यातून बाहेर फेकल्या गेलेल्या व्यक्तींनी गुरु-शिष्य परंपरेतून ही संस्कृती निर्माण केल्याचे मत तृतीयपंथी कवयित्री-कार्यकर्त्या दिशा शेख यांनी व्यक्त केले.  जागतिक मराठी अकादमीतर्फेे  बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ या 15व्या जागतिक संमेलनात निलीमा बंडेलू यांनी वेगळ्या वाटा या कार्यक्रमात तृतीयपंथी कवयित्री-कार्यकर्त्या दिशा शेख यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी एका तडफदार, स्पष्टवक्त्या आणि करारी अशा संवेदनशील व्यक्तीमत्वाचे दर्शन उपस्थितांना झाले.

दिशा शेख यांनी समाजव्यवस्था, अर्थकारण, राजकारण, भावभावना आणि त्यातून निर्माण होणार्‍या कविता अशा विविधांगी संकल्पनांवर प्रभावी भाष्य केले. पूर्वी टोळ्यांनी राहणार्‍या माणसांमध्ये स्वार्थाचा जन्म झाला आणि या स्वार्थापोटी स्त्रीवर अधिराज्य गाजविण्याच्या मानसिकतेतून समाजव्यवस्था निर्माण झाली. अशा पुरुषसत्ताक मानसिकतेच्या व्यवस्थेचे आम्ही बळी आहोत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तृतीय पंथीयांमध्ये लैंगिक जागृती करण्यासाठी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्याविषयी विचारले असता, दिशा शेख यांनी हे प्रयत्न म्हणजे भांडवलवादी अर्थकारणाचे षडयंत्र असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, स्त्री ही नेहमीच उपभोगाची वस्तू राहिलेली आहे. 

आमच्या आरोग्याच्या जागृतीचे गोंडस नाव देऊन हे भांडवलशाही षडयंत्र आखले गेले आहे. यावेळी विविध प्रश्‍नांना उत्तरे देताना त्या म्हणाल्या की, माझा जन्म झाल्यानंतर लौकिक अर्थाने मी मुलगा आहे की, मुलगी हे डॉक्टरांनी माझ्या पालकांना सांगितले. मात्र माझ्यातील वेगळेपणाबद्दल माझ्या जन्मदात्यांनी स्वतः कधी काही जाणून घेतले नाही. त्यामुळे माझा पहिला झगडा हा स्वतःशीच सुरू झाला.