Fri, Nov 16, 2018 20:06



होमपेज › Pune › राज्यमंत्री कांबळे म्हणतात..भुजबळ बाहेर येतील

राज्यमंत्री कांबळे म्हणतात..भुजबळ बाहेर येतील

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





पुणे : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याच्या कारणावरून सध्या तुरुंगात आहेत. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी वारंवार भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. मात्र, भाजपचेच राज्यमंत्री असलेले दिलीप कांबळे यांनी भुजबळ यांच्यावर स्तुतिसुमने उधळत छगन भुजबळ हे गोरगरिबांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्यासारखा लढवय्या माणूस बाहेर असणे आवश्यक असून,  कायद्याची लढाई जिंकून लवकरच ते बाहेर येतील, असे मत व्यक्त केले. दिलीप कांबळे यांनी भुजबळ यांचे कौतुक केल्याने उपस्थितांच्या भुवया  उंचावल्या आहेत.

 महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील फुलेवाड्यावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मंगळवारी ‘समता पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माळी यांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आला. या वेळी केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याच कार्यक्रमात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये आणि भुजबळ समर्थकांसमोर छगन भुजबळ यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.

भुजबळ यांच्याबद्दल बोलताना कांबळे फारच भावूक झाले. “भुजबळ कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. पण, ज्या कलमाच्या आधारे त्यांना जामीन मिळत नव्हता, ते कलमच आता रद्द झाले आहे. त्यामुळे कायद्याची लढाई जिंकून भुजबळ लवकरच बाहेर येतील. त्यांना लवकरात लवकर जामीन मिळावा, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो,’’ असेही कांबळे म्हणाले.  केंद्रीय राज्यमंत्री कुशवाह म्हणाले, की शरद पवार यांच्या बाजूला भुजबळ हवे होते. मात्र, सध्या ते संकटातून जात आहेत. लवकरच ते आपल्यासोबत असतील. महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये समता परिषदेचे काम भुजबळ यांनी केले. समतेचा प्रसार केल्यामुळेच भुजबळांपुढे अडचणी वाढल्याचेही ते म्हणाले. या वेळी शरद पवार यांनी फुले, सावित्रीबाई यांचच्या विचारांचा प्रसार भुजबळांनी देशभरात केल्याचे सांगितले.