Sun, Jun 16, 2019 12:56
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › सोशल मिडियावर बदनामी करणाऱ्या तरूणास अटक

सोशल मिडियावर बदनामी करणाऱ्या तरूणास अटक

Published On: Dec 10 2017 1:37AM | Last Updated: Dec 10 2017 1:27AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

मैत्रिणीचे बनावट फेसबुक खाते तयार करून त्यावर तिचे फोटो व्हायरल करत बदनामी करणार्‍या उच्चशिक्षित तरुणाला पुणे सायबर सेलने अटक केली. त्याने वैयक्तिक वादातून तिची बदनामी करण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. 

नितीन दत्तात्रय बंड (वय 28, रा. जळगाव जामोद, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
नितीन बंड हा मूळचा जळगाव जामोद येथील आहे. त्याचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचे गावात झेरॉक्स सेंटर आहे. दरम्यान यातील पीडित तरुणीही याच गावाची आहे. ती शिक्षणासाठी तेथे असताना आरोपी नितीन याच्या दुकानात झेरॉक्स काढण्यासाठी जात होती. त्या वेळी त्यांची ओळख झाली. त्यांचे बोलणे सुरू झाले. मात्र, त्यानंतर नितीन हा तिच्याशी आणखी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करू लागला. त्या वेळी तरुणीने त्याला बोलणे बंद केले. दरम्यान तरुणी नोकरीनिमित्त पुण्यात आली. 

पुण्यातील एका खासगी कंपनीत ती नोकरी करत आहे. त्या वेळी तिला वेगवेगळ्या मोबाईलवरून फोन येऊ लागले. त्या वेळी तरुणीने फोन करणार्‍या एका व्यक्तीला माझा क्रमांक कोणी दिला, याबाबत विचारले. त्या वेळी तुमचे फेसबुकवर खाते असून, त्यावर तुमचा क्रमांक दिला आहे. तसेच, त्यात कॉल मी असेही लिहिले असल्याचे सांगितले. ज्या वेळी तरुणीने याची माहिती घेतली त्या वेळी तिच्या नावाने बनावट फेसबुक खाते काढल्याचे समोर आले. त्यानंतर तरुणीने याबाबत पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दिली. 

सायबर शाखेच्या उपनिरीक्षक सोनाली फंटागरे व त्यांच्या पथकाने केलेल्या तांत्रिक तपासावरून हे खाते बुलढाण्यातून सुरू असल्याचे समोर आले. त्यानुसार माहिती काढली असता, आरोपी नितीन बंड हा खाते चालवत असल्याचे समजले. त्यानुसार, पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला पुढील तपासासाठी भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दोघांची ओळख होती. मात्र, त्यानंतर तरुणी त्याच्याशी बोलत नसल्याच्या वादातून त्याने हे बनावट खाते काढून तिची बदनामी केल्याचे समोर आले आहे.