Wed, Apr 24, 2019 12:13होमपेज › Pune › राज्यात बिअरच्या विक्रीत 1.21 कोटी लिटरची घट

राज्यात बिअरच्या विक्रीत 1.21 कोटी लिटरची घट

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 10:38PM

बुकमार्क करा

पुणे : समीर सय्यद

बिअरवरील अबकारी करामध्ये 35 ते 40 टक्के वाढ शासनाने केली आहे. त्याविरोधात बिअर उत्पादकांनी नवीन उत्पादन बंद केले आहे; त्यामुळे बाजारात 75 ते 80 टक्के बिअरचा तुडवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे बिअर शौकिनांना नवीन वर्षाचे स्वागतही बिअरविनाच करावे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये तब्बल एक कोटी 21 लाख 26 हजार  लिटर बिअरच्या विक्रीत घट झाली; त्यामुळे शासनाला मिळणारा कोट्यवधीचा महसूल बुडाला आहे.

स्ट्राँग, माईल्ड बिअर पिऊन चिल आऊट होणार्‍या मद्यप्रेमींना चांगलीच ‘किक’ बसणार हे निश्‍चित होते. मात्र, राज्यात औरंगाबाद, लोणंद (फलटण), मुंबई येथे बिअरचे उत्पादन करणार्‍या कंपन्या आहेत. ऑक्टोबरमध्ये बिअरवरील अबकारी करामध्ये 35 ते 40 टक्के वाढ शासनाने केली. त्यामुळे ग्राहकांना हे परवडणारे नाही, असे सांगत कर कमी केल्याशिवाय बिअरचे उत्पादन न करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.

25 दिवसांपासून बिअरचे उत्पादन बंद असल्याने 75 ते 80 टक्के बिअरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मद्यपींना बिअरसाठी भटकावे लागत आहे. बिअरच्या उत्पादनानंतर 6 महिने ते एक वर्षपर्यंत विक्री करता येते; परंतु अनेक परमिट रुममध्ये मुदत संपलेली बिअर विक्री करून मद्यप्रेमींच्या जिवाशी खेळण्याचे प्रकार सुरू आहेत. 

राज्यातील बिअर शॉपी, वाईन शॉप आणि परमिट रूममध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 2 कोटी 44 लाख 56 हजार लिटर स्ट्राँग, माईल्ड बिअरची विक्री झाली होती; तर यंदा नोव्हेंबरमध्ये एक कोटी 23 लाख तीन हजार लिटरची विक्री झाली असून एक कोटी 21 लाख 26 हजार लिटर बिअरच्या विक्रीत घट झाली आहे.  डिसेंबरमध्ये उत्पादन बंदमुळे महसूल घटण्याची शक्यता आहे. शासन आणि उत्पादकांमध्ये अबकारी कर कमी करण्यावरून चर्चा सुरू आहे. सोमवारी यावर सकारात्मक चर्चा होईल, असा विश्‍वास पुणे जिल्हा वाईन ट्रेडर्सचे अध्यक्ष विजय कुट्टी यांनी व्यक्त केला आहे.