होमपेज › Pune › मागणी घटल्याने अंडी स्वस्त

मागणी घटल्याने अंडी स्वस्त

Published On: Dec 03 2017 1:44AM | Last Updated: Dec 03 2017 12:14AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

गेल्या पंधरवड्यात अंड्यांच्या झालेल्या विक्रमी दरवाढीमुळे सर्वसामान्यांनी खरेदीकडे फिरवलेली पाठ आणि मार्गशीर्ष महिन्यामुळे शहरातील ग्राहकांकडून अंड्यांना मागणी घटली आहे. परिणामी, गेल्या आठवड्याच्या तुलनेत इंग्लिश अंड्यांच्या दरात शेकड्यामागे 45 ते 50 तर गावरान अंड्यांच्या दरात 30 रुपयांनी घट झाली असल्याची माहिती व्यापारी रुपेश परदेशी यांनी दिली.  थंडीस सुरुवात झाल्यानंतर खाद्यप्रेमींकडून अंड्यांना मोठी मागणी वाढली होती. आवकेच्या तुलनेत मागणी वाढल्याने अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. मात्र, अंडी आवाक्याच्या बाहेर गेल्याने सर्वसामान्यांना ती खाणे आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. तसेच, मार्गशीर्ष महिन्यात गृहिणींकडून गुरुवारचे उपवास धरण्यात येत असल्याने सर्वसामान्यांनी या काळात अंडी खाणे बंद केले होते. त्यानंतर, अंड्यांच्या मागणीत मोठी घट होण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी सांगितले.  

सध्या शहरातील बाजारपेठेत जिल्ह्याच्या विविध भागातून तसेच सोलापूर आणि हैद्राबाद राज्यातून आवक होत आहे. इंग्लिश अंड्यांच्या शेकड्यास 430 तर गावरान अंड्यास 580 रुपये भाव मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात इंग्लिश अंडी प्रतिडझन 60 तर प्रतिनग 5 आणि गावरान अंडी 108 तर प्रतिनगाची 9 रुपयांना विक्री होत आहे. पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहणार असून मार्गशीर्ष संपल्यानंतर दरात किरकोळ वाढ होण्याची शक्यता व्यापार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अंड्यांच्या दरात घट झाल्याने नोव्हेंबर महिन्यात हॉटेल व्यावसायिकांसह हातगाड्यांवरील खाद्यपदार्थविक्रेत्यांनी अंड्यांच्या पदार्थाचे वाढलेले दर कमी केल्याचे दिसून येत आहे.