Fri, Apr 26, 2019 17:37होमपेज › Pune › स्थायी समिती अध्यक्षपदाचा आज होणार फैसला

स्थायी समिती अध्यक्षपदाचा आज होणार फैसला

Published On: Mar 03 2018 1:48AM | Last Updated: Mar 03 2018 1:47AMपिंपरी :  प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका  स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शनिवारी (दि. 3) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत; त्यामुळे श्रीमंत महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला शनिवारी होणार आहे. अध्यक्षपदाची प्रत्यक्ष निवडणूक बुधवारी (दि. 7) दुपारी बारा वाजता होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी विलास मडिगेरी, राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांच्यात चुरस आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा असतो. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या वर्षाने त्यातील आठ सदस्य निवृत्त होतात. तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. त्यानुसार स्थायी समितीमधील  भाजपचे सहा आणि राष्ट्रवादीच्या दोन महिला नगरसेविका चिठ्ठीद्वारे बाहेर पडल्या आहेत. रिक्त जागी भाजपकडून राहुल जाधव, विलास मडिगेरी, शीतल शिंदे, ममता गायकवाड, नम्रता लोंढे, सागर अंगोळकर, तर राष्ट्रवादीकडून प्रज्ञा खानोलकर, गीता मंचरकर यांची स्थायी समितीत वर्णी लागली आहे. 

स्थायी समितीत भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष सदस्य भाजपसोबत आहे. भाजपचे स्थायी समितीत बहुमत असल्याने भाजपचा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. अध्यक्षपदासाठी विलास मडिगेरी, राहुल जाधव आणि शीतल शिंदे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. मडिगेरी यांच्या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य नेतृत्वाने ‘हिरवा कंदील’ दिला आहे; मात्र भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राहुल जाधव यांच्या नावाचा, तर भाजप शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शीतल शिंदे यांची शिफारस केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पक्ष या तिघांपैकी कोणाला संधी देणार याकडे  निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत 
नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जाणार आहेत. सात मार्च रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे संचालक सुशील खोडवेकर कामकाज पाहणार आहेत, अशी माहिती पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.