होमपेज › Pune › डेक्कन आरक्षण केंद्रात मूलभूत सुविधाच नाहीत

डेक्कन आरक्षण केंद्रात मूलभूत सुविधाच नाहीत

Published On: Jan 04 2018 2:04AM | Last Updated: Jan 04 2018 1:39AM

बुकमार्क करा
पुणे :निमिष गोखले

शहरातील डेक्कन येथील रेल्वे आरक्षण केंद्रात मूलभूत सुविधांचा पत्ताच नसल्याने तिकीट आरक्षित करण्यास येणार्‍या नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. आरक्षण केंद्राची जागा मोठी व प्रशस्त आहे. मात्र जागेचा योग्य वापर करण्यात आलेला दिसून येत नाही. आरक्षण केंद्राच्या पाठीमागील बाजूस मोठे आवार असून, एक वृक्ष पडला आहे. त्या वृक्षाला जाळण्यात आले आहे. तेथे केर-कचरा साठला असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

आरक्षण केंद्रात साधे स्वच्छतागृह नसून, यामुळे तिकीट काढण्यास येणार्‍या नागरिकांची फार मोठी पंचाईत होते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना खासकरून स्वच्छतागृह नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे, मात्र प्युरिफायर नसल्याने पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असून, ते पाणी पिण्यालायक नसल्याचे स्पष्टपणे दिसते. टोकन सिस्टिमचा बोर्ड आरक्षण केंद्रात आहे, मात्र प्रत्यक्षात टोकनच देण्यात येत नसल्याने तो बोर्ड शोभेचाच ठरत आहे. येथे तीन काउंटर असून, सुट्यांच्या हंगामात ज्या वेळी लांबलचक रांगा लागतात, अशा वेळी टोकन सिस्टिम उपयुक्त ठरते; मात्र टोकन सिस्टिम नसल्याने बहुतांश वेळा नागरिकांमध्ये वादविवादाचे प्रसंगदेखील उद्भवले आहेत. 

   येथे असणारी दोन बायोमेट्रिक टोकन मशिन वापराविना पडून असून, नागरिकांच्या पैशांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. आरक्षण केंद्रात आसन व्यवस्थेची सोयच नसून, ज्येष्ठ नागरिकांची यामुळे फरपट होते. सुट्यांच्या हंगामात ज्या वेळी रेल्वे तिकिटासाठी या आरक्षण केंद्रात रांगा लागतात, त्या वेळी पहाटे चारपासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे असतात. दीड-दोन तासांनी त्यांचा नंबर लागल्यावर त्यांना तिकीट उपलब्ध होते. मात्र रेल्वेकडून आसन व्यवस्थाच उपलब्ध करण्यात न आल्याने त्यांना ताटकळत रांगेत थांबावे लागते. यामुळे त्यांची पुरती दमछाक होते. परंतु रेल्वेला याचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसते.    

डेक्कन आरक्षण केंद्राच्या बाहेर दोन बाकडी आहेत; मात्र ती केवळ नावालाच असून, त्यातील एक बाकडे तुटले आहे. डेक्कन रेल्वे आरक्षण केंद्र हे शहरातील मध्यवर्ती व कायमच वर्दळ असणारे आरक्षण केंद्र आहे. मात्र, रेल्वेचा उदासीन कारभार व इच्छाशक्तीचा अभाव यामुळे सध्या या आरक्षण केंद्राची पुरती दुरवस्था झाली असून, त्याकडे तातडीने लक्ष देऊन नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची आता वेळ आली आहे.