Mon, Jul 22, 2019 01:05होमपेज › Pune › डायनिंग कारची लागली ‘वाट’

डायनिंग कारची लागली ‘वाट’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या बहुप्रतिष्ठित, लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव गेलेल्या, आयएसओ मानांकन लाभलेल्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसच्या डायनिंग कारचे खासगीकरण झाल्यामुळे सध्या पुरती वाट लागली आहे. सर्व खाद्यपदार्थांचा दर्जा खालावला असून पुणे स्थानकावर ऑर्डर दिल्यानंतर कर्जत आले तरीदेखील दिलेल्या ऑर्डरचा पत्ताच नसतो. यामुळे प्रवासी भुकेने अक्षरशः व्याकूळ होत असून एकतर ऑर्डर रद्द करतात किंवा पदार्थ येण्याची वाट पाहतात. 

जगातील पहिली डायनिंग कार अशी बिरुदावली मिरवणार्‍या डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारची अवस्था सध्या बिकट झाली असून प्रवाशांनी तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. दि. 1 जून 1930 रोजी डेक्कन क्वीन सुरू झाली. पहिल्या दिवसापासून तिला डायनिंग कार जोडण्यात आली. डिसेंबर 2014 मध्ये या गाडीची डायनिंग कार देखभाल-दुरुस्तीचे कारण सांगून काढून टाकण्यात आली होती व पॅन्ट्री कार जोडली गेली. प्रवाशांच्या रेट्यामुळे तिला पुन्हा डायनिंग कार जोडण्यात आली व पाच महिन्यांपूर्वी अंतर्बाह्य बदल करत नवी कोरी डायनिंग कार जोडण्यात आली. 

दि. 1 नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रशासनाकडे असलेली खानपान सेवा आयआरसीटीसीने व्हरायटी केटरर्सला देऊन तिचे खासगीकरण केले. तेव्हापासून डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील सर्व पदार्थांची चव बिघडली असून रेल्वे प्रशासनाच्या खानपान सेवेबाबत प्रवाशांची कोणतीही तक्रार नसताना देखील त्यांच्याकडून ही सेवा का काढण्यात आली, हा प्रश्‍न सध्या सर्वांनाच सतावत आहे. सर्व पदार्थांची चव सपक झाली असून आपुलकी संपली आहे, अशा भावना प्रवाशांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. 

डायनिंग कार खासगी ठेकेदाराच्या घशात मुद्दाम घालण्यात आली असून काळाबाजार व पैसे खाण्याकरिताच हे पाऊल उचलले गेले आहे. ठेकेदाराकडे सध्या स्वतःचे कर्मचारी नसून आयआरसीटीसीने स्वतःचे स्वयंपाकी दिले असून एका प्रकारे हा उप करारच (सब काँट्रॅक्ट) केला आहे. स्वयंपाक करणार्‍या कर्मचार्‍यांकडे मेडिकल सर्टिफिकेट नसून इन्स्पेक्शन सर्टिफिकेटही नसल्याने एका प्रकारे प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. असे रेल्वे प्रवासी गु्रपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.