Tue, Nov 20, 2018 11:25होमपेज › Pune › तरुणांना गंडा घालणारे दाम्पत्य अटकेत

तरुणांना गंडा घालणारे दाम्पत्य अटकेत

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

विवाह संकेतस्थळावर पत्नीच्या नावे बनावट खाते तयार करून लग्नाचे आमिष दाखवत पुण्यातील तरुणांना लाखोंचा गंडा घालणार्‍या नागपुरातील पती-पत्नीला पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने अटक केली आहे. किशोर चुडामण रामटेककर (वय 34) व रिंकी ऊर्फ कामिनी किशोर रामटेककर (28, दोघेही रा. वाठोडी, नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या दाम्पत्याची नावे आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात सिंहगड रोड परिसरात राहणार्‍या एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाचा घटस्फोट झाल्याने त्याने पुनर्विवाहासाठी मेट्रोमोनीवर नाव नोंदविले होते.

त्या वेळी पल्लवी असलकर नावाच्या मुलीने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधून ती झारखंड येथील रायगडची राहणारी आहे. तसेच  वडील सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात, असे सांगितले आणि त्याचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर वडिलांना हृदयविकाराचा झटका आला असून, पैशांची आवश्यकता असल्याचे तरुणाला सांगितले. त्यामुळे त्याने वेळोवेळी तिच्या खात्यावर 2 लाख 15 हजारांचा भरणा केला. त्यानंतर तिने वडिलांचे निधन झाल्याचेही त्याला कळविले आणि फोन बंद केला.

मात्र वारंवार फोन करूनही तो लागत नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी तो छत्तीसगड येथील रायगडला गेला. तेथे जाऊन त्याने तिच्याबाबत चौकशी केल्यावर अशा नावाची कोणीही व्यक्ती येथे काम करत नाही असे सांगितले. त्यासोेबतच सांगवी येथील एका तरुणाची अशा प्रकारे फसवणूक झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडून सुरू असताना पुण्यातील आणखी 7 ते 8 तरुणांची अशा प्रकारे 20 लाखांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

त्यामुळे प्रत्येक गुन्ह्यात समानता असल्याचे दिसून आल्याने आरोपींनी वापरलेल्या मोबाईल क्रमांकांचे विश्‍लेषण करण्यात आले. त्यानंतर ते दोघेही नागपूर येथील असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा नागपूर येथे शोध घेतला. त्या वेळी किशोर रामटेककर व रिंकी ऊर्फ कामिनी रामटेककर अशा दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी अशा प्रकारे फसवणूक केल्याचे कबूल केले. ही कारवाई पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस हवालदार अस्लम अत्तार, सरिता वेताळ, कुर्‍हे, शेलार, दिवाने यांच्या पथकाने केली.