Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Pune › साडेतीन हजार घरांचा ‘डीपीआर’ म्हाडाकडे

साडेतीन हजार घरांचा ‘डीपीआर’ म्हाडाकडे

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 12:44AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांत घरे बांधली जाणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात बांधण्यात येणार्‍या 3 हजार 445 घरांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेने म्हाडाकडे दिला आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे. देशातील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना हाती घेतली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या कुटुंबाचे देशात कोठेच हक्काचे घर नाही, अशांना या योजनेंतर्गत हक्काचे घर देण्यात येणार आहे. शहरी भागात झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास, आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न घटकांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून घरांची निर्मिती, खासगी भागीदारीद्वारे परवडणार्‍या घरांची निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान, अशा विभागांत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

या योजनेंतर्गत शहरातील विविध भागांत पालिकेने आठ जागा निश्चित केल्या आहेत. या जागांवर 61 इमारती बांधल्या जाणार असून, त्यामध्ये 6 हजार 324 सदनिका बांधण्यात येणार आहेत. याचा डीपीआर पालिकेने राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्यातील काही डीपीआरमध्ये आक्षेप काढण्यात आल्या असून, 3 हजार 445 घरांचा डीपीआर मान्य करण्यात आल्याने तो म्हाडाकडे पाठविण्यात आला आहे. परवडणार्‍या घरांसाठी पालिकेने नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत 28 हजार 90, कर्ज संलग्न व्याज अनुदानासाठी 28 हजार 148, परवडणार्‍या घरांसाठी 41 हजार 783, तर वैयक्तिक घरकुल बांधण्यासाठी अनुदानासाठी 15 हजार 207 असे सुमारे एक लाख 13 हजार 228 अर्ज आले आहेत. या योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.