Mon, Jul 22, 2019 02:39होमपेज › Pune › पुणे : पैसा महापालिकेचा, झेंडे मात्र भाजपचे

पुणे : पैसा महापालिकेचा, झेंडे मात्र भाजपचे

Published On: Jun 21 2018 12:24PM | Last Updated: Jun 21 2018 12:24PMपुणे : हिरा सरवदे  

महानगरपालिकेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन आज (२१ जून) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महापालिका परिसरात उभारण्यात आलेले स्वागत कमानीजवळ आणि बॅरीकेटच्या माध्यमातून तयार कलेलेल्या कंपाऊंडवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे झेंडे लावण्यात आले आहेत. उद्घाटन कार्यक्रमानिमित्ताने पालिकेच्या पैशातून करण्यात आलेल्या व्यवस्थेवर भाजपचे झेंडे लावण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. हा प्रकार चुकीचाच आहे, मात्र सत्ताधाऱ्यांना सांगणार कोण, अशी प्रतिक्रीया पालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेचा वाढता विस्तार आणि वाढते नागरिकरणामुळे पालिकेचे कामही वाढले आहे. पालिकेत येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाढत्या कामामुळे सध्या अस्तित्व असलेली पालिकेची इमारत अपुरी  पडत असल्याने इमारतीच्या दक्षिण बाजूस चौरस आकारात देखणी अशी नवीन विस्तारीत इमारत तयार करण्यात आली आहे. या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन आज दुपारी साडेतीन वाजता उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमासाठी पालिकेच्या परिसरात जुन्या प्रवेशद्वारावर दोन आणि नव्या विस्तारीत इमारतीच्या दक्षिणेस एक, आशा तीन स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. विस्तारित इमारतीच्या दक्षिण बाजूस सीमा भिंत नसल्याने लोखंडी बॅरीकेट्सला पांढरे कापड लावून कंपाऊंड तयार केले आहे. हे संपूर्ण काम पालिकेच्या पैशातून करण्यात आले आहे असे असतानाही, आणि कार्यक्रम महापालिकेची असतानाही पालिका परिसरात आणि कंपाऊंडच्या बॅरीकेट्सवर सत्ताधारी भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. उपराष्ट्रपती हे पद घटनात्मक असून त्यांच्या उपस्थित होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या परिसरात राजकीय पक्षाचे अस्तित्व दिसू नये, तसेच सरकारी पैशातून उभारलेल्या कोणत्याही मालमत्तेवर राजकीय झेंडे असू नयेत, असा संकेत आहे. या संकेताला सत्ताधारी भाजपने केराची टोपली दाखवत पालिका परिसरात पक्षीचे झेंडे लावले आहेत. पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या या कृतीवर पालिकेतील अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे तर विरोधकांकडून सडकून टिका होत आहे. 

तिरंगा उतरून भाजपचा झेंडा लावू नये, म्हणजे झाले :

सत्ताधाऱ्यांना सत्तेची नशा चढली आहे. सरकारी कार्यक्रमात पक्षाचे अस्तीत्व दिसू नये आणि ते असू नये असा संकेत आहे. मात्र पालिकेच्या कार्यक्रमासाठी पालिकेच्या पैशातून उभारलेल्या व्यवस्थेवर भाजपचे झेंडे लावणे दुदैवी आहे. प्रोटोकॉल अधिकाऱ्यांनी ते काढायला हवेत. आम्ही सत्तेत असताना असे कधी केले नाही. सत्ताधाऱ्यांनी पालिकेवरील तिरंगा उतरून भाजपचा झेंडा लावू नये, म्हणजे झालं. असा टोला पालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी लगावला आहे.

झेंडे रस्त्यावर लावण्यास सांगितले होते : 

पक्षाचे झेंडे रस्त्यावर लावण्यास सांगितले होते. ते जर बॅरीकेट्स किंवा स्वागत कमानीजवळ लावले गेले असतील तर ते काढण्यात येतील, अशी प्रतिक्रीया महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे.