बाधितांनी ओलांडला सात हजारांचा टप्प्पा

Last Updated: Jun 04 2020 1:03AM
Responsive image


पुणे : पुढारी वृत्तसेवा 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना बुधवारी दिवसभरात 294 नवे रुग्ण आढळले असून, शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ही 7 हजार 89 वर पोहचली आहे. तर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 8 हजारहून अधिक झाली आहे. बुधवारी पुण्यात नऊ जणांचा बळी गेला असून, दिवसभरात कोरोनातून बरे झालेल्या 229 जणांना घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत जिल्ह्यातील एकुण 282 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

दिवसभरात पुणे शहर 288, पिंपरी-चिंचवडमध्ये 31, पुणे ग्रामीण व कॅन्टोन्मेंट परिसरात 21 असे 340 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8474 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात 378 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात दिवसभरात 1 हजार 249 संशयित नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ससून हॉस्पिटलमध्ये 17, डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये 222 आणि खासगी हॉस्पिटलमध्ये 55 असे 294 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.  शहरातील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 348 इतकी आहे. तर, विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाचे उपचार घेत असलेले 165 रुग्ण अत्यवस्थ आहेत. यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 2 हजार 389 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

 पुण्यात बुधवारी दोन पुरुष, मुलगा आणि सहा महिला अशा 9 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 8, शहर तर पिंपरी चिंचवडमधील एका रुग्णाचा समावेश आहे.  मृतांमध्ये दोन रुग्ण इतर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत. मृतांमध्ये मुंबईतील कांदिवली ईस्ट भागातील महिला (80), बीड जिल्ह्यातील मुलगा (15), येरवडा महिला (60), गंज पेठेतील महिला (44), खडकी स्टेशन महिला (70), मंगळवार पेठेतील महिला (49), पर्वती येथील महिला (65), कल्याणीनगर पुरुष (77) आणि देहूरोड येथील पुरुष (70) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. बीडमधील मुलाला 16 मे रोजी दाखल करण्यात आले होते. त्याला किडनीविकार आणि एसएलई हे आजार होते. त्याचा कोरोनासह न्यूमोनिया, हृदययविकाराचा धक्‍का यामुळे मृत्यू झाला. इतर सर्वांना कोरोनासह श्‍वसनविकार, उच्च रक्‍तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, न्यूमोनियासारखे आजार होते. त्यामुळे शहरातील मृतांची संख्या 352 झाली आहे.