Fri, Jul 19, 2019 05:28होमपेज › Pune › मेट्रो साहित्य रचाचण्यांसाठी  ‘ब्यूरो व्हेरिटास’शी करार

मेट्रो साहित्य रचाचण्यांसाठी  ‘ब्यूरो व्हेरिटास’शी करार

Published On: Dec 13 2017 2:38AM | Last Updated: Dec 13 2017 2:09AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

‘महामेट्रो’च्या  पुणे मेट्रो प्रकल्पातर्फे ‘ब्यूरो व्हेरिटास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ (बीव्हीआयएल) या कंपनीबरोबर करार करण्यात आला असून त्याअंतर्गत प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे.    मेट्रो’चे प्रकल्प संचालक महेश कुमार आणि ‘बीव्हीआयएल’चे संचालक उमेश जाधव यांनी मंगळवारी या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, पुणे मेट्रोचे तांत्रिक सल्लागार शशिकांत लिमये, प्रकल्प संचालक हुकुम सिंग चौधरी, क्वालिटी अश्युरन्स प्रमुख केशव तायडे, बीव्हीआयएलचे रुशीत पडालिया या वेळी उपस्थित होते.

फ्रान्समधील ‘ब्यूरो व्हेरिटास’ ही कंपनी 1828 पासून कार्यरत असून 140 देशांमध्ये त्यांची कार्यालये आहेत. ‘ब्यूरो व्हेरिटास इंडिया प्रायव्हेट लिमिटेज’ ही फ्रान्समधील ‘ब्यूरो व्हेरिटास’ समुहाची शंभर टक्के उपकंपनी असून भारतात जवळपास सर्व मोठ्या शहरांमध्ये कंपनीच्या प्रयोगशाळा आहेत. या कंपनीच्या मदतीने पुणे मेट्रोच्या कामासाठी जागतिक दर्जाच्या चाचणी सेवा उपलब्ध होतील.

    महामेट्रोने मेट्रोच्या बांधकामासाठी लागणार्‍या कच्च्या मालाच्या दर्जा तपासणीसाठी ठबीव्हीआयएल’च्याच सहाय्याने नागपूरमध्ये एक प्रयोगशाळा स्थापन केली आहे. पुण्यातील प्रयोगशाळा मेट्रो प्रकल्पाच्या ‘रीच 1’ मध्ये नाशिक फाट्याजवळील 45 हजार चौरस फूट जागेत उभारण्यात येणार आहे. बांधकाम साहित्याच्या चाचण्यांसाठी या ठिकाणी अद्ययावत साधनसामुग्री उपलब्ध असणार आहे. विशेष प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञ चाचण्यांचे काम करणार आहेत. या माध्यमातून कंत्राटदारांना त्यांच्या बांधकाम साहित्याची चाचणी कमी वेळात करून घेता येणार असून त्यांना चाचण्यांचे अहवाल ‘ऑनलाईन’ उपलब्ध होऊ शकतील. प्रकल्प ठरलेल्या वेळात पूर्ण होण्यास त्यामुळे मदतच होणार आहे. सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापना व कंत्राटदारांना या प्रयोगशाळेच्या सुविधा वापरता येणार आहेत.