होमपेज › Pune › मुंढव्यात संगणक अभियंता युवतीने केली आत्महत्या

मुंढव्यात संगणक अभियंता युवतीने केली आत्महत्या

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:56AMपुणे : प्रतिनिधी

मुंढव्यातील आयटी कंपनीतील संगणक अभियंता युवतीने सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी घडला. दरम्यान तिने कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अश्‍विनी पांडुरंग गवारे (22, रा. धर्मानगर, चंदननगर, मूळ रा. विठ्ठलवाडी, ता. शिरूर) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अश्‍विनी हिचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. मुंढव्यातील पिंगळे वस्ती येथे वंशज ही सातमजली सोसायटी आहे. या सोसायटीत चौथ्या मजल्यावर ग्लोबल टँलेट टॅ्रक ही कंपनी आहे. कंपनीत मुला-मुलींंना मुलाखत तसेच फोनवर कसे बोलायचे याचे प्रशिक्षण दिले जाते.  

याठिकाणी गेल्या चार महिन्यांपासून अश्‍विनी प्रशिक्षणासाठी येत होती. मात्र, गेल्या सात दिवसांपासून ती प्रशिक्षणासाठी आली नव्हती. सोमवारी अश्‍विनी गवारे सकाळी नेहमीप्रमाणे येथे आली. त्यानंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ती चौथ्या मजल्यावरून सोसायटीच्या सातव्या मजल्यावर गेली आणि  गॅलरीतून खाली उडू मारून आत्महत्या केली. दरम्यान येथील नागरिकांनी तत्काळ याची माहिती मुंढवा पोलिसांना दिली. तसेच, तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. मात्र, पोलिसांनी तिला मृत घोषित केले. तिच्या आत्महत्येचे ठोस कारण समजू शकलेले नाही. परंतु, तिने कुटुंबातील ताण-तणावातून आत्महत्या केल्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी सांगितले. तिच्या पालक तसेच नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. ते आल्यानंतर अधिक माहिती समजेल असे सांगण्यात आले.