Thu, Apr 25, 2019 03:43होमपेज › Pune › तब्बल दीड किलोमीटर पोलिसाला फरफटत नेले

तब्बल दीड किलोमीटर पोलिसाला फरफटत नेले

Published On: Jan 30 2018 2:17AM | Last Updated: Jan 30 2018 1:34AMपुणे :  प्रतिनिधी

फसवणुकीबाबत आलेल्या तक्रारीवरून संशयिताला पकडण्यासाठी सापळा रचल्यानंतर पोलिस कर्मचारी असल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्याच्या अंगावर कार घातली; कर्मचारी कारच्या बोनेटवर पडल्यावर  त्याला दीड किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे शनिवारी (दि. 27 ) हा थरार वर्दळीच्या वेळी चतुःशृंगी मंदिर ते पाषाण रोडवरील ग्रामीण पोलिस मुख्यालयापर्यंत घडला आहे. यात पोलिस कर्मचारी हेमंत खरात (गुन्हे शाखा)  जखमी झाले आहेत.  याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

  याप्रकरणी दीपक सोनी व त्याचा साथीदार कारचालक अशा दोघांवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न; तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दीपक सोनी व त्याच्या साथीदाराने नोकरी लावण्याच्या बहाण्याने काही जणांकडून 30 हजार रुपये घेतले. त्याबाबतची तक्रार गुन्हे शाखेकडे आली आहे. त्यांना पोलिसांकडे याबाबत चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. मात्र, तो येत नव्हता. दरम्यान ते शनिवारी सेनापती बापट रस्त्यावर एका नागरिकाकडून पैसे घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या परिसरात सापळा लावला.

फिर्यादी हेमंत खरात हे चतुःशृंगी मंदिराजवळील प्राईड इमारतीजवळ थांबले होते. त्या वेळी कारमध्ये दोघे आले. खरात व त्यांच्या सहकार्‍यांनी कारला हात करून थांबविली. कार थांबल्यानंतर एका कर्मचार्‍याने त्याला पोलिसाचे आयकार्ड दाखवले; तर, खरात हे कारसमोर उभे होते. मात्र, दोघांनी पोलिस असल्याचे समजताच समोर उभे असणारे कर्मचारी खरात यांच्या अंगावर कार घालून ती सुसाट पळविली. खरात हे उडून कारच्या बोनेटवर पडले. कर्मचार्‍यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला; तरीही कार न थांबवता दोघांनी कार भरधाव पुढे नेली. त्या वेळी खरात हे बोनेटला धरून तसेच कारवर होते. पाषाण रोडने ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर या ठिकाणी अचानक कारचा वेग कमी झाला. त्या वेळी फिर्यादी खरात यांनी उडी मारली. त्यानंतर दोघेही तेथून पसार झाले. हा सर्व थरार शनिवारी सव्वापाच ते पावणेसहाच्या  सुमारास घडला.