Tue, Jul 23, 2019 04:18होमपेज › Pune › शहरातील भुयारी मार्ग बनले स्वच्छतागृह

शहरातील भुयारी मार्ग बनले स्वच्छतागृह

Published On: Dec 17 2017 2:21AM | Last Updated: Dec 17 2017 12:59AM

बुकमार्क करा

पुणे :नेहा सराफ  

एकीकडे सर्वोत्कृष्ट सार्वजनिक वाहतुकीची स्वप्ने बघणार्‍या आणि त्यासाठी शेकडो कोटी रुपये गुंतवणार्‍या पुणे महापालिकेला आहेत ते रस्तेही नीट सांभाळता येत नसल्याचे दिसून आले आहे. शहरातील नागरिकांपेक्षा अधिक संख्येने असलेल्या वाहनांमुळे आधीच रस्ते भरून जात आहेत. त्यामुळे रस्ता  ओलांडण्यासाठी बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गांचा वापर वाढण्याऐवजी ते मार्ग आता अघोषित 
स्वच्छतागृह बनल्याचे ‘पुढारी’च्या पाहणीत दिसून आले आहे. शहरात अनेक भागात वेगवेगळ्या नागरिकांची गरज लक्षात घेऊन महापालिकेने भुयारी रस्ते बनवले आहेत. त्यातील वनाज चौक, डहाणूकर रस्ता आणि कर्वेनगर चौक येथील भुयारी मार्गांची दुरवस्था बघायला मिळाली.

त्यातील वनाज चौकातील नानासाहेब धर्मधिकारी भुयारी मार्गात पानसदृश्य पदार्थांच्या पिचकार्‍यांनी भिंत रंगली आहे. संपूर्ण भुयारी मार्गात दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. डहाणूकर चौकात असलेल्या भुयारी मार्गात कोणत्याही प्रकारच्या दिव्यांची व्यवस्था नाही. दिवे अडकवण्यासाठी त्यात असलेल्या खाचेत दिवेच नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण भुयारी मार्गाची अंधारखोली बनते. पायर्‍या संपल्यावर खाली टाकीचे झाकण असल्याने अनेकजण घसरून पडतात. याही मार्गात दुर्गंधी आणि अस्वच्छता आहेच पण, सर्वात कहर कर्वेनगर चौकातील भुयारी मार्गात आहे. या मार्गाच्या पायर्‍याही नाक दाबूनच उतराव्या लागतात. इतकेच नव्हे तर आतमध्ये सिगारेटची पाकिटे आणि दारूच्या बाटल्याही दिसत आहेत.

याशिवाय आतमध्ये पाणी असल्याने चालणेही मुश्किल झाले आहे. याही ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधारात चाचपडत चालावे लागते. यापैकी कोणत्याही मार्गात सीसीटीव्ही कॅमेरे आढळले नसून त्यामुळे अनेकांकडून या मार्गाचा वापर दारू पिण्याच्या अड्ड्यासारखा होतो आहे. भविष्यात एखादा गैरप्रकार घडला तर मात्र प्रशासनाची ही उदासीनता पुणेकरांच्या जीवावर बेतणार आहे.