Sun, Feb 17, 2019 00:59होमपेज › Pune › ‘सनबर्न’वर बावधनकरांचे पाणी

‘सनबर्न’वर बावधनकरांचे पाणी

Published On: Dec 14 2017 2:16AM | Last Updated: Dec 14 2017 1:55AM

बुकमार्क करा

पुणे/पौड : प्रतिनिधी

मुळशी तालुक्यातील लवळे येथील ऑक्सफर्ड गोल्फ क्लब येथे वर्षाअखेरीस होणार्‍या सनबर्न विरोधात बावधन येथील ग्रामस्थांनी बुधवारी (दि. 13) हिंजवडी पोलिसांना निवेदन दिले आहे. याठिकाणी एकही गाडी जाऊ न देण्याचा शड्डू नगरसेवक किरण दगडे यांनी ठोकला आहे. यामुळे सनबर्न विरोधात पुन्हा एकदा नागरिकांना संघर्ष  करावा लागणार आहे. मुळशी तालुक्यातील लवळे ते बावधनदरम्यान डोंगरावरील बावधन आणि लवळे हद्दीत 28 ते 31 डिसेंबर दरम्यान पर्सेट लाईव्ह या कंपनीने गाण्यांच्या व नृत्याच्या सनबर्न या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एका वेबसाईटवर या कार्यक्रमाची तिकिटे विकली जात आहेत. मात्र, हा सनबर्न फेस्टिव्हल पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात तेही बावधन गावच्या हद्दीत होत असल्याने बावधनच्या ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी तीव्र विरोध केला आहे. या कार्यक्रमास परवानगी देऊ नये, असे पत्र हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण वायकर यांना दिले आहे. 

राजकीय नेत्यांसह स्थानिक रहिवाशांनी बुधवारी (दि. 13) हिंजवडी पोलिसांना पत्र देत या कार्यक्रमाला विरोध केला आहे; मात्र या कार्यक्रमाला लवळे ग्रामपंचायत तसेच इतर शासकीय स्तरावर लागणार्‍या सर्व परवानग्या या पर्सेट लाईव्ह कंपनीने घेतलेल्या आहेत. वादग्रस्त सनबर्न गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या कार्यक्रमाला येथील नागरिकांनी या कार्यक्रमात नशाबाज तसेच अंमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे म्हणत मोठा विरोध केला होता. तरीही हा कार्यक्रम वाघोली परिसरात पार पडला होता. आता या वर्षाच्या शेवटी मुळशी तालुका आणि पुणे शहराच्या हद्दीवर हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमालाही विरोध होण्यास सुरूवात झाली आहे.