Tue, Feb 19, 2019 03:57होमपेज › Pune › चौथ्या मजल्यावरून पडून  8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

चौथ्या मजल्यावरून पडून  8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Published On: Jan 29 2018 1:45AM | Last Updated: Jan 29 2018 12:15AMपुणे : प्रतिनिधी

मित्रांसोबत पतंग उडविण्यासाठी गेलेल्या एका 8 वर्षांच्या मुलाचा चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. कोंढव्यातील व्हीआयटी कॉलेजच्या मागील परिसरात हा प्रकार घडला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. आतिक चाँदसाब शेख (वय 8, अश्रफनगर, कोंढवा बुद्रुक) असे या घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हीआयटी कॉलेजच्या मागे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून एक चार मजली अर्धवट बांधकाम झालेली इमारत आहे. या इमारतीमध्ये जाण्यासाठी गेटही आहे. रविवारची सुटी असल्याने आतिक आणि त्याचे इतर तीन मित्र सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पतंग उडविण्यासाठी या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर गेले होते. पतंग उडवित असताना आतिक गच्चीच्या कडेला गेला त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि तो चौथ्या मजल्यावरून थेट खाली कोसळला. गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 

आतिकसोबत पतंग उडविण्यासाठी गेलेल्या इतर मुलांनी त्याच्या नातेवाईक तसेच इतरांना ही माहिती दिली. या दुर्दैवी घटनेची माहिती परिसरात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. आतिकच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली होती. आतिक हा कोंढवा बुद्रुक परिसरातील प्रतिभाताई पवार प्राथमिक विद्या मंदिर या शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत होता. आतिकचे वडील चाँदसाब शेख हे टेम्पोचालक आहेत, तर आई गृहिणी आहे. आतिकला एक मोठा भाऊ आहे. आतिकचे चुलतेही अब्दुल शेख हे याच परिसरात राहण्यास आहेत. कोंढवा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील चौकशी सुरू केली आहे.