होमपेज › Pune › कर्नाटक आंब्याचा हंगाम लांबणीवर

कर्नाटक आंब्याचा हंगाम लांबणीवर

Published On: Feb 27 2018 1:57AM | Last Updated: Feb 27 2018 1:23AMपुणे : प्रतिनिधी

आंब्याच्या हंगामात हंगामपुर्व हजेरी लावणारा कर्नाटक हापूस यंदा प्रतिकूल हवामानामुळे लांबणीवर पडला आहे. ओखी वादळ तसेच वातावरणात झालेल्या बदलांमुळे आंब्याचा मोहोर गळून पडल्याने यंदाच्या हंगामातील आवक अद्याप झालेली नाही. त्यामुळे पुढील महिन्यापासून हा हंगाम सुरू होण्याचा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत. गुलटेकडी मार्केटयार्डातील बाजारात दरवर्षी रत्नागिरी, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथून हंगामपूर्व सर्व आंब्याची आवक होत असते. यामध्ये हापूस, तोतापुरी, बदाम, पायरी व लालबागचा समावेश आहे. सध्या बाजारात केरळ येथून आंब्याची आवक सुरू आहे.

तर, दक्षिणेतील कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडू या राज्यांतील आंब्याचा हंगाम लांबणीवर पडला आहे. दरवर्षी 26 जानेवारी पासून सुरू होणारा हंगाम यंदा 22 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. सध्या काही प्रमाणात आंबा असला तरी त्याची तेथील स्थानिक बाजारात विक्री होत आहे. दरम्यान, या आंब्याला मुंबई व अहमदाबाद येथील मार्केटमध्ये पाठविण्यात येत आहे. कलकत्ता तसेच उत्तरेकडील राज्यातील लोकांची मोठी पसंती मिळत असल्याने या भागातील व्यापारी दक्षिणेत जाऊन आंब्याची खरेदी करीत असल्याने शहरातील बाजारात अपेक्षित आवक होताना दिसत नाही.

याबाबत बोलताना कर्नाटक हापूस आंब्याचे व्यापारी रोहन उरसळ म्हणाले, दरवर्षी सर्वप्रथम केरळमधून व त्यानंतर कर्नाटक व आंध्रप्रदेशातून आंबा बाजारात दाखल होतो. यंदा दक्षिणेतील राज्यांमध्ये आंब्याचे 30 ते 40 टक्के उत्पादन झाले आहे. सध्या बाजारात बाजारात हापूसचे 20 ते 25 बॉक्स, लालबाग व बदामची 100 ते 200 किलो, पायरीचे 10 बॉक्स दाखल होत आहे. हापूसच्या 1 डझनास 800 ते 1 हजार, पायरी 700 ते 800 तर लालबागच्या 1 किलोस 150 ते 160 आणि बदामला 140 ते 160 रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी अखेर बाजारात ही आवक मोठ्या प्रमाणात होत होती. मात्र, यंदा त्यामध्ये मोठी घट झाली आहे. दरम्यान, 15 एप्रिलपासून चांगल्या प्रमाणात आंबा बाजारात उपलब्ध होऊन त्याची मे महिन्यात आवकेत मोठी वाढ होईल असेही त्यांनी सांगितले.