Wed, Jul 17, 2019 20:16होमपेज › Pune › चांदणी चौक उड्डाणपुलासाठी  80 कोटींचा निधी केला वर्ग 

चांदणी चौक उड्डाणपुलासाठी  80 कोटींचा निधी केला वर्ग 

Published On: Jan 24 2018 1:47AM | Last Updated: Jan 24 2018 1:02AMपुणे : प्रतिनिधी 

चांदणी चौक परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी या चौकात उड्डाणपुल उभारण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या पुलाचे काम सुरु झाल्यानंतर पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी अडथळा ठरणार्‍या जागा ताब्यात घेण्यासह चांदणी चौक विकसित करण्यासाठी 80 कोटी रुपयांचे वर्गीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पालिकेच्या स्थायी समितीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीमध्ये चांदणी चौक विकसित करण्यासाठी निधीचे वर्गी करण करण्यात आले. मुंबई आणि कोकणात जाण्यासाठी सर्वाधिक वहानचालकांकडून शहराच्या पश्‍चिम भागातील चांदणी चौकाचा वापर केला जातो.

 त्यामुळे या चौकात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. ही वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी पालिकेकडून उड्डाणपुल साकारला जाणार आहे. उड्डाणपुलाच्या कामाचे भूमीपूजन 27 ऑगस्ट 2017 रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. सहा महिन्यांत पुलाचे काम सुरू केले जाईल, असे आश्‍वासन यावेळी गडकरी यांनी दिले होते. या आश्‍वासनास साडेचार महिने उलटले तरीही पुलाच्या कामासाठी भूसंपादन ढाले नाही. त्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत भूसंपादा न केल्यास हे काम रद्द करण्याचा इशारा एनएचएआयने दिला होता.  

या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी जागा मालकांची बैठक बोलावली होती.  दरम्यान भूसंपादनापोटी रोख मोबदला देण्यासाठी सुमारे 150 कोटीची आवश्यकता असल्याचा प्राथमिक अंदाज पालिका प्रशासनाच्या व्यक्त केला होता. ही जागा रस्त्यासाठी घेतली जाणार असून त्या जागेपोटी 2 टीडीआर देण्याची तरतूद आहे. मात्र, फ्लॅटचा आकार लहान असल्याने तसेच नागरीक टीडीआर घेऊन काय करणार त्यामुळे या नागरिकांना जागेचा मोबदला चालू रेडीरेकरनच्या दुप्पट दराने रोख स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीडीपीच्या जागांसाठी मोबदला कसा द्यायचा,  ही नवी अडचण प्रशासनासमोर आहे. या भूसंपादनासाठी लागणारा हा निधी उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीने 80 कोटीचे वर्गीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. या उड्डणपूलाच्या कामासाठी सुमारे 15 हेक्टर जागेची आवश्यकता असून त्यात 7 हेक्टर बीडीपीची जागा आहे. तर इतर जागांवर 88 फ्लॅट, 2 इमारती व 1 बंगला अशी सुमारे 100 रहिवासी घरे आहेत.