Mon, Aug 26, 2019 01:59होमपेज › Pune › सिझेरियन’चा टक्‍का वाढला

सिझेरियन’चा टक्‍का वाढला

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 14 2018 1:23AM

बुकमार्क करा
पुणे ः प्रतिनिधी

जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सहा शासकीय रुग्णालयांत सिझेरियन प्रसूतींची संख्या वाढण्यासाठी आरोग्य विभागाने खासगी डॉक्टरांशी ऑक्टोबरपासून करार केला आहे. तेव्हापासून येथे सिझेरियन प्रसूतींची संख्या पूर्वीपेक्षा तिपटीने वाढली आहे.    ग्रामीण भागात सिझेरियन प्रसूतीसाठी (सिझेरियन डिलिव्हरी) महिलांना खासगी रुग्णालयात 30 ते 50 हजारांच्या दरम्यान खर्च येतो. हा खर्च त्यांना कर्ज अथवा उसने पैसे घेऊन करावा लागतो.  कारण शासकीय रुग्णालयांत स्पेशालिस्ट डॉक्टरांची वानवा असते. ही बाब लक्षात आल्यानंतर आरोग्य आयुक्‍त व राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. संजीव कुमार यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी ठोस पाऊल उचलले.

स्पेशालिस्ट डॉक्टर कायमस्वरूपी कामावर घेणे शासनाला परवडणारे नसल्याने त्यांनी स्थानिक खासगी डॉक्टरांनाच सिझेरियन प्रसूतीनुसार पैसे देण्याच्या तत्त्वावर करार केला. मात्र, ही सेवा गर्भवतींना सामान्य प्रसूती असो अथवा सिझेरियन असो, पूर्णपणे मोफत आहे.   सिझेरियन प्रसूतीसाठी स्त्री-रोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि सोनोलॉजिस्ट  यांची गरज भासते. या तज्ज्ञांना प्रत्येक रुग्णामागे ठराविक रक्‍कम देण्याचा करार करण्यात आला आहे.  यामध्ये प्रत्येक सिझेरियनमागे स्त्री-रोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञांना प्रत्येकी चार हजार, बालरोगतज्ज्ञाला दोन हजार; तर सोनोलॉजिस्टला 400 याप्रमाणे पैसे देण्यात येतात. तसेच गरज पडल्यास ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू उपलब्ध असतो. यामुळे येथे अनेक  गर्भवतींची सिझेरियन तसेच सामान्य प्रसूतींमध्येही वाढ होऊ लागली आहे.

  जिल्ह्यात जुन्नर ग्रामीण रुग्णालय, सासवड ग्रा. रुग्णालय, बारामती महिला रुग्णालय, भोर उपजिल्हा रुग्णालय, दौंड उपजिल्हा रुग्णालय आणि इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षी 24 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबरदरम्यान टप्प्याटप्प्याने ही सेवा सुरू करण्यात आली. राज्यात सुरुवातील पुण्यातच हा पथदर्शी तत्त्वावरील प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) सुरू करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे त्याचा विस्तार करण्यात येऊन तो सातारा आणि सोलापूर येथेही प्रत्येकी दोन ठिकाणी सुरू करण्यात आला आहे. त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पुणे परिमंडलचे सहायक आरोग्य उपसंचालक डॉ. पी. जी. दर्शने यांनी दिली.

  गेल्या ऑक्टोबरपासून जुन्नर ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत 112, सासवड ग्रा. रुग्णालय 47, बारामती महिला रुग्णालयात 185, भोर उपजिल्हा रुग्णालय 35, दौंड उपजिल्हा रुग्णालय- 135 आणि इंदापूर उपजिल्हा रुग्णालय 30 याप्रमाणे एकूण 544 सिझेरियन प्रसूती झाल्या;  तर 1589 सामान्य प्रसूती करण्यात आलेल्या आहेत. यामुळे येथील ग्रामीण भागातील महिलांची लाखो रुपयांची बचत झालेली आहे. हा प्रकल्प राज्यातील इतर जिल्ह्यामध्ये राबविण्याचा आरोग्य विभाग गांभीर्याने विचार करत आहे.