Sun, Apr 21, 2019 14:29होमपेज › Pune › डोक्यात दगड घालून सव्वातीन लाखांची लूट

डोक्यात दगड घालून सव्वातीन लाखांची लूट

Published On: Dec 03 2017 2:38AM | Last Updated: Dec 03 2017 1:44AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ऑफिसबॉयच्या डोक्यात दगड घालून सव्वातीन लाख रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार घडला आहे. बाणेर परिसरातील स्टेट बँकेच्या दारातच हा प्रकार सकाळी हा प्रकार घडला.   दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणीच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, याघटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  उमेश शिवाजी कदम (30, रा. संतोष सावता माळी मंदिराजवळ, भुजबळ चौक, वाकड) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्या फिर्यादीनुसार, तीन अनोळखी व्यक्तींंवर गुन्हा दाखल झाला आहे. 

उमेश कदम हा वाकड परिसरातील सूर्या हॉस्पिटल येथे ऑफिसबॉय म्हणून नोकरी करतो. त्याच्याकडे बँकेतील रोकड भरणे, तसेच चेक देण्याचेही कामकाज आहे. त्याच्याकडे शनिवारी सकाळी हॉस्पिटलची 3 लाख 23 हजारांची रोकड एचडीएफसी बँकेत भरण्यासाठी दिली होती. त्यासोबतच, बाणेर परिसरातील आयकॉन टॉवर बिल्डिंगमध्ये असणार्‍या स्टेट बँकेच्या शाखेत चेक भरण्यासाठी दिला होता. चेक व रोकड घेऊन तो सकाळी साडेअकराच्या सुमारास बाणेर स्टेट बँकेच्या शाखेत आला, तेव्हा ही घटना घडली.