पुणे : प्रतिनिधी
पार्टीनंतर पुन्हा दारूच्या शोधासाठी निघालेल्या पाच मित्रांच्या कारचा गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला; एक गंभीर जखमी असून, एकजण किरकोळ जखमी आहे. कात्रज बायपास रस्त्यावरील शिलाई वर्ल्ड शोरूमसमोर ही दुर्घटना घडली. भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती एका विजेच्या खांबावर आदळून 20 फूट खाली कोसळली. दरम्यान, चालकाने मद्यपान केल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये भारती विद्यापीठ महाविद्यालयातील एका प्राध्यापकाचा समावेश आहे.
निखिल दिलीप चौगुले (27, रा. नर्हे, मूळ पन्हाळा, कोल्हापूर), आशुतोष मोहन यादव (25, रा. कोथरूड, मूळ सांगली), धीरज धोंडीराम शिंदे (33, रा. भूगाव, मूळ भिसवडी, जि. सांगली) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. चालक सुशांत चंद्रकांत पाटील (28, रा. बेलवडे, कराड) हा गंभीर जखमी आहे. दिग्विजय शरद महाजन (24, रा. नर्हे) हा किरकोळ जखमी आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जण मित्र असून, ते गुरुवारी एकत्र भेटले. त्यानंतर दिग्विजय याच्या रूमवर रात्री साडेदहाच्या सुमारास मद्यपान करण्यासाठी बसले होते. मद्यपान केल्यानंतर त्यांना आणखी मद्यपान करण्यासाठी दारू हवी होती. त्यामुळे ते सर्व जण मध्यरात्री दोन वजता कारमधून दारू घेण्यासाठी बाहेर पडले. ते कात्रज चौकात आले; परंतु त्यांना तेथे दारू मिळाली नाही. त्यामुळे ते परत कात्रजवरून बायपास रोडने नर्हेच्या दिशेने निघाले. त्या वेळी सुशांत पाटील हा कार चालवीत होता. दरम्यान मद्यपान केले असल्याने सुशांत पाटील हा भरधाव कार चालवत होता.
कार अभिनव कॉलेजसमोर आल्यानंतर पाटील याचे कारवरील नियत्रंण सुटले. कार भरधाव असल्याने ती शिलाई वर्ल्ड शोरूमजवळील आंबेगाव बुद्रुककडे जाणार्या रस्त्यावर विजेच्या एका खांबावर जाऊन आदळली. कार भरधाव असल्याने खांबावर आदळल्यानंतर ती सर्व्हिस रोडने उतारावरून घसरत एका भिंतीवर आदळून 20 फूट खाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेतून भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, निखिल चौगुले व आशुतोष यादव यांचा रुग्णालयात जाण्यापूर्वीच मृत्यू झाला; तर, डी. डी. शिंदे याचा उपचारांदारम्यान मृत्यू झाला.
गाडी हळू चालव...
पाचहीजण रात्री भेटल्यानंतर महाजन याच्या रूमवर गेले. तेथे त्यांनी मद्यपान केले; परंतु दारू संपल्याने त्यांना पुन्हा दारू हवी होती; त्यामुळे ते कात्रज चौकात आले. दारू न मिळाल्याने ते परत येत होते. त्या वेळी पाटील हा कार चालवत होता. तो कार भरधाव चालवत असल्याने त्याला सवार्र्ंनी कार हळू चालव, असे सांगितले. मात्र, तरीही तो कार भरधाव चालत होता. दुर्दैैवाने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व कारचा भीषण अपघात झाला.
दिग्विजय महाजन हा मूळचा सांगली जिल्ह्यातील असून, गेल्या एक वर्षापासून पुण्यात आहे. त्याची पुण्यात स्वतःची सोलर सिस्टिम कंपनी आहे. सुशांत पाटील हा टुरिस्टचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे फियाट कंपनीची पुन्टो कार (एमएच.12.आर. 8273) आहे. महाजन व पाटील हे चांगले मित्र आहेत; तर, चौगुले हा एक महिन्यापूर्वीच नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. तो नोकरी शोधत होता. आशुतोष यादव हा शिवाजीनगर परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.धीरज शिंदे हे भारती विद्यापीठ महाविद्यालयात ध्यापक होते, ते मेकॅनिकल विषय शिकवत होते.